जि. प. भरती; ८५१ उमेदवारांची दांडी
By Admin | Updated: November 9, 2014 23:28 IST2014-11-09T23:01:40+5:302014-11-09T23:28:50+5:30
जिल्हा परिषद प्रशासनाने सायंकाळी उशिरा गुणपत्रिका जाहीर केल्याने जिल्हा

जि. प. भरती; ८५१ उमेदवारांची दांडी
सांगली : जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी आज, रविवारी झालेल्या लेखी परीक्षेस २८८२ पात्र उमेदवारांपैकी तब्बल ८५१ जण गैरहजर राहिले. शहरातील नऊ महाविद्यालयांत ही परीक्षा घेण्यात आली. जिल्हा परिषद प्रशासनाने सायंकाळी उशिरा गुणपत्रिका जाहीर केल्याने जिल्हा परिषद आवारात उमेदवारांची गर्दी झाली होती.
आज सकाळी ग्रामपंचायत विभागातील कंत्राटी ग्रामसेवक पदाच्या ४८ जागांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेला २६४७ उमेदवार पात्र ठरले होते. त्यातील १८५६ जण परीक्षेस बसले. या परीक्षा शहरातील आठ केंद्रांवर घेण्यात आल्या. यामध्ये गणपतराव आरवाडे, राणी सरस्वतीदेवी कन्या शाळा, पटवर्धन हायस्कूल, पुरोहित कन्या प्रशाला, मालू हायस्कूल, सर्वोदय विद्यालय, दडगे हायस्कूल, कोठारी गुजराती हायस्कूल या केंद्रांचा समावेश होता.
त्याचप्रमाणे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आरेखक पदाच्या एका जागेसाठी पात्र १८ उमेदवारांपैकी १२ जण उपस्थित होते. छोटे पाटबंधारे विभागाच्या आरेखक पदाच्या एका जागेसाठी पात्र २८ उमेदवारांपैकी १७ जण हजर होते. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बांधकाम विभागाच्या एका जागेसाठी पात्र २४ उमेदवारांपैकी १७ जण, तर अभियांत्रिकी सा. बांधकाम विभाग छोटे पाटबंधारे विभागाच्या आठ जागांसाठी पात्र १६५ उमेदवारांपैकी १२९ जण उपस्थित होते. या विभागाच्या परीक्षा उर्दू हायस्कूल येथे घेण्यात आल्या. गुणपत्रिकेबाबत काही हरकती असल्यास दि. ११ नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत नोंदवाव्यात, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)