जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर!
By Admin | Updated: March 4, 2017 03:39 IST2017-03-04T03:39:34+5:302017-03-04T03:39:34+5:30
महसूलमंत्री, विरोधी पक्षनेते, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांचे चौकशीसह कारवाईचे सुमारे ४३ आदेशही निघाले आहेत

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर!
ठाणे : शेतजमीन हडप केल्याप्रकरणी महसूलमंत्री, विरोधी पक्षनेते, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांचे चौकशीसह कारवाईचे सुमारे ४३ आदेशही निघाले आहेत. मात्र, ते सारे धाब्यावर बसवून कल्याणचे प्रांत, तहसीलदार यांच्याकडून शेती हडप करणाऱ्या व्यापाऱ्यास पाठीशी घातले जात आहे. यामुळे या अधिकाऱ्यांवर शिस्तभंग व फौजदारी गुन्हे दाखल करा, यासाठी कल्याणजवळील वाघेरेपाडा येथील आदिवासी बाळाराम शिद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे.
सुमारे सात वर्षांपासून कल्याणच्या वाघेरेपाड्यातील शिद हे आदिवासी शेतकरी व समाजसेवक विशाल गुप्ता हे प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहेत. कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गास लागून असलेली करोडो रुपयांची शेतजमीन खरेदीची खोटी कागदपत्रे सादर करणारे, मूळचे शेतकरी नसलेले उल्हासनगर येथील प्रकाश बुधराणी व त्यांच्या साथीदारांना प्रांत, तहसीलदार, मंडल अधिकारी आणि तलाठी पाठीशी घालत आहेत. खोटेनाटे कागदपत्र तयार करण्यास मदत करून जमिनी हडप केल्याची तक्रार या शेतकऱ्यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यास अनुसरून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनादेखील त्यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. यामध्ये विभागीय आयुक्त, जिल्हा प्रशासन, महसूल विभागदेखील अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शेतकऱ्याची वाघेरेपाडा गावाजवळील सर्व्हे. नं. ४७/१-अ, ब ही जमिन परस्पर विक्री झाल्याचे शिद यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. खरेदीचे खोटे व निरर्थक कागदपत्र सादर करणारा हा शेतकरी नसल्याचा न्यायालयीन आक्षेप असतानाही प्रांत व तहसीलदारांनी खरेदी खताच्या फेरफार नोंदी केल्या आहेत. तसेच येथे १२ गोडाऊन बांधूनही केवळ सहा दाखवण्यात आले. (प्रतिनिधी)
> महामार्गालगत ही शेतजमीन असून सुमारे एक किमी असल्याचा खोटा अहवाल तयार केलेला आहे. शेतजमिनीवरील या गोडाऊनमध्ये सुरू असलेले लघुउद्योग त्वरित बंद करून ती तोडण्यात यावीत. विद्युतपुरवठा खंडित करावा, आदी स्वरूपाच्या कारवाई आदेशांवर प्रांत, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांनी अद्यापही कारवाई केली नाही. यामुळे या अधिकाऱ्यांसह खोटा शेतकरी असलेल्या बुधराणी यांच्यावरदेखील कडक कारवाई करण्याची मागणी या आदिवासी शेतकऱ्याने मुख्यमंत्री, मुख्य सचिव यांच्याकडे लावून धरली आहे.