राज्यातील जिल्हा रुग्णालयात आता मोफत केमोथेरपीची सुविधा, पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 02:37 PM2018-04-06T14:37:34+5:302018-04-06T14:37:34+5:30

कर्करोगावरील उपचारामध्ये महत्त्वाची भूमिका असणाऱ्या केमोथेरपीची मोफत सुविधा आता राज्यातील जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येत आहे.

District chemotherapy facility in now includes free chemotherapy facilities | राज्यातील जिल्हा रुग्णालयात आता मोफत केमोथेरपीची सुविधा, पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांचा समावेश

राज्यातील जिल्हा रुग्णालयात आता मोफत केमोथेरपीची सुविधा, पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांचा समावेश

Next

मुंबई - कर्करोगावरील उपचारामध्ये महत्त्वाची भूमिका असणाऱ्या केमोथेरपीची मोफत सुविधा आता राज्यातील जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येत आहे. साधारणता जून महिन्यापासून या योजनेचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. त्यात नागपूर, गडचिरोली, पुणे, अमरावती, जळगाव, नाशिक, वर्धा, सातारा, भंडारा आणि अकोला या 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. पुढील महिन्यापासून जिल्हा रुग्णालयातील फिजिशिअन आणि नर्स यांना मुंबईतील टाटा रुग्णालयात याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

कर्करोगाच्या उपचारात केमोथेरपी महत्त्वाची भूमिका बजावते. त्यासाठी मुंबईतील टाटा रुग्णालयातर्फे आवश्यकतेनुसार सुमारे सहा आठवड्यांचा केमोथेरपी कोर्स रुग्णाला दिला जातो. यासाठी रुग्णाला दर आठवड्याला मुंबईत यावे लागते. त्यांना प्रवासाचा होणारा ताण, आर्थिक ताण ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन आता मोफत किमोथेरपीची सुविधा जिल्हा रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी घेतला आहे. या सुविधेमुळे कर्करुग्णांना स्थानिकस्तरावरच उपचार घेता येणे शक्य होणार आहे. 

राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमानुसार देशात वर्षभरात सुमारे 11 लाख कर्करुग्ण आढळून येतात. देशात जुने आणि नवे मिळून सुमारे 28 लाख कर्करुग्णांची संख्या आहे. त्यापैकी पाच लाख मृत्यू दरवर्षी कर्करोगाने होतात. महाराष्ट्रातील कर्करोगाचे प्रमाण कमी करण्याबाबत राज्य शासनातर्फे उपाययोजना केल्या जातात. उपचारासोबतच प्रतिबंधात्मक आणि जाणीवजागृतीपर मोहीम हाती घेतली जाते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संपूर्ण महिनाभर मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. दिवसेंदिवस कर्करोगाचा वाढता प्रसार पाहता त्याच्या उपचारासाठी आरोग्य विभाग आणि टाटा रुग्णालयाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. 

या सुविधेच्या पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. किमोथेरपी औषध देण्याचे प्रशिक्षण प्रत्येक जिल्हा रुग्णालयातील एक फिजिशिअन आणि स्टाफ नर्स यांना देण्यात येणार आहे. टाटा रुग्णालयाच्या सहकार्याने मेडिकल ऑन्कोलॉजी विभागात तीन आठवड्यांचे हे प्रशिक्षण दिले जाणार असून, मे महिन्यापासून पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालयांना फिजिशिअन आणि नर्स यांची नावे कळविण्यास सांगितली आहेत. 

जूनपासून हे केमोथेरपी युनिट जिल्हा रुग्णालयात सुरू होणार- आरोग्यमंत्री
केमोथेरपीचा सहा आठवड्यांचा कोर्स टाटा रुग्णालयाकडून रुग्णांना दिला जातो. पहिल्या आठवड्याचा कोर्स हा टाटा रुग्णालयातच घेतला जातो. आता जिल्हा रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध करून देणार असल्याने राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना त्यासाठी मुंबईत येण्याची गरज भासणार नाही. यामुळे त्यांचा निवासाचा आणि प्रवासाचा खर्च वाचणार असून रुग्णाला होणारी दगदग कमी होण्यास मदत होणार आहे. जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी युनिट सुरू करण्यासाठी लागणाऱ्या औषधांची यादी देखील टाटा रुग्णालयातून घेण्यात आली आहे. साधारणता जुनपासून हे युनिट जिल्हा रुग्णालयात सुरू होतील. उर्वरित जिल्हा रुग्णालयात दुसऱ्या टप्प्यात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: District chemotherapy facility in now includes free chemotherapy facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.