एक व्यथित 'पोपट'पंची!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2020 11:34 AM2020-11-08T11:34:00+5:302020-11-08T11:37:11+5:30

अगदी परवाच याचा अतिरेक झाल्यानं ही व्यथा मला येथे मांडावी लागतेय. एका न्यूज चॅनेलच्या एका संपादकांना अटक झाली. या संपादकांना ‘पोपट’ म्हणून हिणवलं जातंय.

A distressed parrot! | एक व्यथित 'पोपट'पंची!

एक व्यथित 'पोपट'पंची!

googlenewsNext

- अभय नरहर जोशी-   

सध्या अत्यंत व्यथित असलेला असा मी एक पोपट आहे. त्या व्यथेला मी येथे ‘चोच’ फोडत आहे. आता आमच्या या व्यथेलाही ‘पोपटपंची’च म्हंटले जाईल. काय करणार... ही आमच्या या शुक कुळाची शोकांतिकाच आहे. या माणसांनी आमचा जो पूर्वापार सोयीस्कर वापर करून घेतलाय त्यामुळे आमचा अगदी ‘पोपट’ झालाय.

अगदी परवाच याचा अतिरेक झाल्यानं ही व्यथा मला येथे मांडावी लागतेय. एका न्यूज चॅनेलच्या एका संपादकांना अटक झाली. या संपादकांना ‘पोपट’ म्हणून हिणवलं जातंय. वास्तविक या संपादकांत आणि आमच्यात (त्यांच्या डोळ्यांचा अपवाद सोडल्यास) कोणतंही साम्य नाही. त्यांच्या आवाजाइतकी आमची रेंजही नाही. ‘इंडिया वॉंटस् टू नो...’ असं ते ज्या पट्टीत म्हटतात तेवढी कीरकीर आमच्या कीर जमातीतील कोणीही करू शकणार नाही. अगदी मैनेची शप्पथ! अहो आम्ही राघु आहोत. आम्ही मिठू मिठू बोलतो, असा गैरसमज या माणसांनीच पसरवलाय. मग आम्ही अशा कंठाळ्या आवाजात बोलू का? कुणा पक्षाचे हे संपादक ‘पोपट’ आहेत, असं त्यांना हिणवलं जातंय. (का आमचा असा अपमान करता?)  या ‘पोपटा’ला आम्ही पिंजऱ्यात टाकलं, असं काही ‘वाघांचं’ म्हणणं आहे. पण तेच ‘पिंजऱ्यातले वाघ’ आहेत, असाही काही ‘माजी वाघांचा’ आक्षेप आहे. असो. आता या वादात आमचा असा ‘उध्दार’ करण्याची गरज होती का? या आधीही सीबीआयला 'पिंजऱ्यातला पोपट' म्हणून कोर्टाने आमचा 'उद्धार' केला होता.

आता काही दिवसांपूर्वी ‘देशाचे कारभारी’ एका भव्य स्मारकाच्या पायथ्याशी पर्यटन केंद्राचं उद्घाटन करण्यास गेले, तेव्हा त्यांच्या हातावर, खांद्यावर बसण्याची आम्हाला बळजबरी केली गेली. दुसऱ्या दिवसापासून या कारभाऱ्यांसोबत आमचीही हेटाई सुरू झाली. आमचीही व्यंगचित्र झळकू लागली. आमचा एक बांधव त्या कारभाऱ्यांच्या रुळणाऱ्या पांढऱ्या व्हाईट्ट दाढीला पाहून बुजला व त्यांच्या हातावर जाऊन बसला नाही. तर त्याचा सोयीस्कर राजकीय अर्थ काढला गेला.

एखाद्याची फटफजिती झाली, की त्याचा कसा ‘पोपट’ झाला, असं म्हंटलं जातं. विचार करा, आम्हाला कसं वाटत असेल? मिरच्या आम्हाला आवडतात, झोंबत नाहीत, म्हणून अशा ‘मिरच्या’ झोंबायला लावायच्या? मागे आमचा एक बांधव माजी मुख्यमंत्रीण बाईंचा लाडका झाला होता. तो रोज त्यांच्या अंगा-खांद्यावर जाऊन बसत असे. अगदी डोक्यावरही बसायचा.  तर त्याच्या ओरडण्यात बाईंना ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ असा भास होत असे, असा अजब शोध एका पांचट पत्रकाराने लावला अन् त्यावर भली मोठी ‘पुणेरी मिसळ’ लिहिली. त्यामुळे आम्हाला काही प्रायव्हसीच उरली नाही. स्पेसही दिली जात नाही. त्या ‘कावळा-चिमणी-कबुतरां’ना ही माणसं पिंजऱ्यात टाकत नाहीत. पण दिसला ‘पोपट’  की टाक पिंजऱ्यात, ही काय वृत्ती आहे? नावं ठेवतानाही पोपट, शुक, कीर, तोता यापेक्षा जरा भारदस्त नावे द्यायचीत ना. त्यातल्या त्यात राघु हे नाव बरं आहे. तरी ‘राघु’ म्हणताना विजातीय ‘मैने’शी ‘अनैतिक’ संबंध ही माणसं जोडतातच. आमची ही व्यथा त्या आदरणीय पु. ल. देशपांडेंनीच मांडली. त्यांची आज जयंती, त्यांना विनम्र अभिवादन! पुलंनी आम्हाला पुरतं ओळखलं होतं. आम्हाला ‘क्यीर्र’ शिवाय कोणतीही बोली येत नाही, असं सांगून आमच्या पोपटपंचीला त्यांनी केव्हाच मोडीत काढलंय. तेच बरोबर आहे. असो.

                                                                                 (लेखक 'लोकमत'च्या पुणे आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)

 

Web Title: A distressed parrot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे