दिलखेचक अदाकारींची उधळण
By Admin | Updated: February 1, 2015 01:57 IST2015-02-01T01:57:21+5:302015-02-01T01:57:21+5:30
सूर, ताल, नृत्याचा सुंदर मिलाप घडवित सौंदर्यवतींनी सप्तकलांची उधळण करीत अकलूजच्या २३व्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेला दिमाखात प्रारंभ केला.

दिलखेचक अदाकारींची उधळण
अकलूज (सोलापूर) : सूर, ताल, नृत्याचा सुंदर मिलाप घडवित सौंदर्यवतींनी सप्तकलांची उधळण करीत अकलूजच्या २३व्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेला दिमाखात प्रारंभ केला. लावणी सम्राज्ञी वैशाली जाधव-परभणीकर हिच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ झाला.
शंकरनगर-अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समितीतर्फे स्मृतीभवनात २३व्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक हौशी कलावंताच्या तर रविवारी पारंपरिक लावणी कलावंतांचे सादरीकरण होणार आहे.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशीचे पहिले सादरीकरण करण्याचा मान मुंबईच्या देवयानी चंदगडकर निर्मित ‘सोळा हजारांत देखणी’ या पार्टीला मिळाला. पार्टीच्या मोनाली सावर्डेकर, सरीता म्हात्रे, देवयानी चंदगडकर, रूपाली हाके, तेजाली चव्हाण, दिपाली जाधव, ममता पेठकर या नृत्यांगनांनी ढोलकीच्या तालावर नखरेल अदाकारीने मुजरा सादर केला.