वाढीव वीज बिलांमुळे नागरिकांमध्ये असंतोष

By Admin | Updated: June 30, 2016 02:46 IST2016-06-30T02:46:53+5:302016-06-30T02:46:53+5:30

शहरातील वीज ग्राहकांना वाढीव रकमेची बिले पाठविण्यात आली आहेत.

Dissatisfaction with citizens due to increased electricity bill | वाढीव वीज बिलांमुळे नागरिकांमध्ये असंतोष

वाढीव वीज बिलांमुळे नागरिकांमध्ये असंतोष


नवी मुंबई : शहरातील वीज ग्राहकांना वाढीव रकमेची बिले पाठविण्यात आली आहेत. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून बिलांमध्ये तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे.
वाशी, सानपाडा, सीबीडी, बेलापूर, नेरूळ परिसरातील नागरिकांना वाढीव वीज बिले देण्यात आली आहेत. वाशी सेक्टर २ मधील काही नागरिकांना एक महिन्यासाठी ८ ते १२ हजार रुपये बिल पाठविण्यात आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होवू लागला आहे. महावितरणचे कर्मचारी तक्रारीची दखल घेत नसल्याने नागरिकांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडे धाव घेतली होती. या तक्रारीची दखल घेवून म्हात्रे यांनी महावितरणच्या वाशी कार्यालयात जावून कार्यकारी अभियंता एस. एस. किन्नेर यांची भेट घेतली. नागरिकांना दिलेल्या बिलांमध्ये चुका आहेत. अनेक बिलांवर फोटो नाहीत. रिडिंग स्पष्ट दिसत नाही. ठेकेदार वेळेत रिडिंग घेत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. याशिवाय मीटरमध्ये बिघाड झाल्यास किंवा केबल खराब झाली तर त्याचा भुर्दंडही ग्राहकांना सोसावा लागत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
वाढीव वीज बिले तत्काळ कमी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनीही ज्या ग्राहकांना वापरापेक्षा जास्त बिल गेले असेल तर ते दुरुस्त करून दिले जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, मारुती भोईर, संपत शेवाळे, कृष्णा पाटील, जितेंद्र कांबळी, दीपक पवार, एकनाथ मगडवार, आर. आर. पाटील, विक्रम पराजुली, प्रमिला खडसे व इतर नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Dissatisfaction with citizens due to increased electricity bill