नवजात बालकाचा छिन्न-विच्छिन्न मृतदेह
By Admin | Updated: March 6, 2017 02:04 IST2017-03-06T02:04:07+5:302017-03-06T02:04:07+5:30
बाभुळसर खुर्द (ता. शिरूर) येथे एक मृत नवजात बालक आढळून आले

नवजात बालकाचा छिन्न-विच्छिन्न मृतदेह
शिरूर : बाभुळसर खुर्द (ता. शिरूर) येथे एक मृत नवजात बालक आढळून आले. या बालकाच्या शरीराचा बहुतांश भाग
कुत्र्याने खाल्ल्याने बालक स्त्री किंवा पुरुष जातीचे आहे, हे ओळखणे अवघड झाले. हे नवजात बालक स्त्री जातीचे असावे, अशी चर्चा परिसरात रंगली होती. पोलिसांत या घटनेची नोंद करण्यात आली असून, तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
२६ फेब्रुवारीला सकाळी साडेदहाच्या सुमारास बाभुळसर येथे उत्तम भिकाजी भालेराव यांच्या दारात सदर नवजात बालक आढळून आले. कुत्र्याने ओढून त्यांच्या दारात टाकले. बालकाच्या शरीराचा बराचसा भाग कुत्र्याने खाल्ल्याचे आढळून आले. भालेराव यांनी पोलिसांत खबर दिल्यावर पोलिसांनी पंचनामा केला.
नवजात बालकाला नक्की कुठे फेकले, कोणी फेकले याची काहीही माहिती नसल्याने अज्ञात व्यक्तीने जन्माची लपवणूक करून विल्हेवाट लावण्याच्या हेतूने अज्ञात ठिकाणी त्यास टाकून दिले, अशी नोंद पोलिसांत करण्यात आली.
‘लोकमत’ने तालुक्यातील एकूणच गर्भलिंग निदान व स्त्रीभ्रूणहत्येविषयी मालिका प्रसिद्ध केल्यावर शहर व तालुक्यातील अनेक सोनोग्राफी सेंटर्स व गर्भपात केंद्रे बंद करण्यात आली होती.
बाभुळसर येथे सापडलेले बालक हे स्त्री जातीचेच असावे असा कयास आहे. ते कळू नये म्हणून त्याला कुत्र्याच्या हवाली केले, जेणेकरून स्त्री जातीचे हे बालक होते समजू नये, अशीही चर्चा रंगली. शिरूरसारख्या (याबाबत) बदनाम तालुक्यात हे घडू शकते याची जणू लोकांना खात्री आहे. पोलिसांपुढे आता याचा तपास लावण्याचे आव्हान आहे. पोलिसांनी प्रामाणिकपणे याचा तपास केल्यास याचा छडा लागू शकेल. (वार्ताहर)
नवजात बालक अशा पद्धतीने आढळल्याने उलटसुलट चर्चा सुरु होती. स्त्री जातीचे बालक असल्याने या बालकास फेकले असावे, अशी चर्चा रंगली होती. गर्भलिंग निदान व स्त्रीभ्रूण हत्या याबाबत तसेही शिरूर तालुक्याचे नाव बदनाम आहे.
काही वर्षांपूर्वी घोड नदीत शनीमंदिराजवळ दोन बालके मृतावस्थेत आढळली होती. याबाबत ‘लोकमत’ने वाचा फोडली असता संबंधित एका डॉक्टरवर गर्भलिंगनिदान केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला होता.