१४ वर्षांपूर्वीचा अहवाल धुळीत
By Admin | Updated: May 14, 2015 02:39 IST2015-05-14T02:39:39+5:302015-05-14T02:39:39+5:30
काळबादेवी येथील आगीच्या भीषण दुर्घटनेनंतर मुंबईत दाटीवाटीने उभ्या असलेल्या जुन्या इमारतींच्या सुरक्षेचे उपाय सुचविण्यासाठी समिती

१४ वर्षांपूर्वीचा अहवाल धुळीत
मुंबई : काळबादेवी येथील आगीच्या भीषण दुर्घटनेनंतर मुंबईत दाटीवाटीने उभ्या असलेल्या जुन्या इमारतींच्या सुरक्षेचे उपाय सुचविण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे़ प्रत्यक्षात १४ वर्षांपूर्वी अशाच एका घटनेच्या चौकशीत तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अजित जैन यांनी सुचविलेला सुरक्षेचा अहवाल मात्र धूळ खात पडून आहे़
आग लागल्यानंतर पाण्याचा मारा सहन न करू शकणारी काळबादेवी येथील गोकूळ निवास ही इमारत कोसळली़ अशा अनेक इमारती काळबादेवी, भुलेश्वर या परिसरात दाटीवाटीने उभ्या आहेत़ अरुंद मार्ग, चिंचोळी गल्ली आणि सोने घडविण्याचे छोटे कारखाने व ज्वलनशील रसायनांचा साठा असलेला हा विभाग आगीवर वसला आहे़ त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी जैन समितीने १२ उपाय सुचविले होते़ मात्र वर्षे सरली तसा हा अहवालही बासनात गुंडाळण्यात आला़
काळबादेवी, भुलेश्वर येथील सोने घडविणाऱ्या कारखान्यांकडे कालांतराने पालिकेने दुर्लक्ष केले़ येथील जवळपास सर्वच इमारतींच्या तळमजल्यावर सोने घडविण्याची छोटी छोटी केंद्रे आहेत़ यापैकी असंख्य दुकाने बेकायदा असल्याने त्यावर कारवाई करण्याची मागणी भुलेश्वरमधील स्थानिक रहिवाशांकडून वेळोवेळी होत आहे़ आता काळबादेवीतील आगीच्या घटनेनंतर तरी ही परिस्थिती बदलणार का, असा प्रश्न सर्वच स्तरांतून विचारला जात आहे. (प्रतिनिधी)