मुंबईत नव्हे, आता ग्रामसभेतच चर्चा
By Admin | Updated: June 5, 2017 05:04 IST2017-06-05T05:04:01+5:302017-06-05T05:04:01+5:30
किसान क्रांती कोअर कमिटीचा धिक्कार करीत यापुढे सरकारशी कुठलीही चर्चा होणार नाही़ सरकारला शेतकऱ्यांशी चर्चा करायची असेल

मुंबईत नव्हे, आता ग्रामसभेतच चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर/पुणतांबा : किसान क्रांती कोअर कमिटीचा धिक्कार करीत यापुढे सरकारशी कुठलीही चर्चा होणार नाही़ सरकारला शेतकऱ्यांशी चर्चा करायची असेल, तर त्यांनी ग्रामसभेत खुली चर्चा करावी, असा इशारा देत पुणतांबा ग्रामस्थांनी सोमवारी महाराष्ट्र बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे़ शेतकऱ्यांनी रविवारी अकोले, पाथर्डी, पारनेर, श्रीगोंद्यासह नगर- सोलापूर मार्गांवर रास्ता रोको करीत दूध व भाजीपाला रस्त्यावर फेकला. जिल्ह्यातील सर्वच आठवडे बाजार बंद होते.
शेतकऱ्यांमध्ये फूट पडल्याची चर्चा सुरू होताच संपाच्या चळवळीचे केंद्रबिंदू असलेल्या पुणतांबा ग्रामस्थांनी एकत्र येऊन संप सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे़ संपाची सूत्रे नामदेव धनवटे, डॉ़ धनंजय धनवटे, बाळासाहेब चहाण, विजय धनवटे यांनी हाती घेतली आहेत़ गावासह जिल्ह्यातील इतर शेतकरी एकत्रित संपाची दिशा ठरवतील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला़ रविवारी ग्रामस्थांनी मुंडण करून सरकारचा निषेध केला. आंदोलनात नगर जिल्हा व उस्मानाबादचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते़
किसान क्रांती समन्वय समितीने जाहीर केल्याप्रमाणे संप पुढे सुरूच ठेवण्यावर जिल्ह्यातील शेतकरी ठाम आहेत़ कोअर कमिटी विसर्जित होण्याबाबत सोमवारीच निर्णय होण्याची शक्यता आहे. कोअर कमिटीचे सदस्य जयाजी सूर्यवंशी यांचे ठिकठिकाणी पुतळे जाळण्यात आले. रविवारी दिवसभर गावोगावी संपाबाबत नियोजन बैठका सुरू होत्या. त्यामुळे सोमवारचा संप तीव्र असण्याची शक्यता आहे.