चर्चा अजित पवार यांच्या मुलाखतीची
By Admin | Updated: June 2, 2014 06:39 IST2014-06-02T06:39:40+5:302014-06-02T06:39:40+5:30
लोकमतमध्ये प्रकाशित झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष मुलाखतीचीच चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली.

चर्चा अजित पवार यांच्या मुलाखतीची
अतुल कुलकर्णी, मुंबई - लोकमतमध्ये प्रकाशित झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष मुलाखतीचीच चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली. सायंकाळी सह्णाद्री विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत देखील पत्रकारांनी या मुलाखतीवरुन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्र्यांना अनेक प्रश्न केले. रविवारी दिवसभर एबीपी माझा, आयबीएन लोकमत, मी मराठी अशा विविध चॅनलनी दिवसभर या मुलाखतीवरुन बातम्या दाखवल्या. लोकसभा निवडणुकीच्या दारुण पराभवानंतर अजित पवार कोठेही, काहीही बोललेले नव्हते. पक्षाच्या मेळाव्यात देखील त्यांनी कोणतीही भूमिका जाहीरपणे मांडलेली नव्हती. लोकमतशी बोलताना मात्र त्यांनी रोखठोक भूमिका मांडली होती. अनेक प्रश्नांना त्यांनी ठामपणे उत्तरं दिली होती. आधी नेता निवडा, मग निवडणूक लढा! असे आपले मत असल्याचे अजित पवार यांनी या मुलाखतीत सांगितले होते. त्यावर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले. मुख्यमंत्र्यांनी त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न केला तेव्हा अजित पवार म्हणाले, ते माझे व्यक्तिगत मत आहे आणि माझे मत मला मांडण्याचा अधिकार नाही का? तेवढा तरी अधिकार मला ठेवा. आपण अजूनही नाराज आहात का, असे सवाल पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्र्यांच्या समोर अजित पवार म्हणाले, ‘पूर्वी जसे काम चालू होते तसेच आताही चालू आहे’ त्यावर जोरदार हशां पिकला. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडेंनाही या मुलाखतीवरुन माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारले. त्यावर तावडे म्हणाले, अजित पवार यांनी ही गुगली टाकलेली आहे. नरेंद्र मोदींना उमेदवार जाहीर करण्यामागे पक्षाची भूमिका होती. काँग्रेस कधीही आपला मुख्यमंत्री जाहीर करत नाही. त्यामुळे ही गुगली कशी काम करेल ते पाहू असेही ते म्हणाले.