सत्तेत सामावून घेण्यासाठी शिवसेनेसोबत उद्यापासून चर्चा - मुख्यमंत्री
By Admin | Updated: November 27, 2014 15:05 IST2014-11-27T14:56:25+5:302014-11-27T15:05:55+5:30
राज्यात शिवसेनेला सत्तेत सामील करुन घेण्यासाठी भाजपा तयार असून यासंदर्भात उद्यापासून शिवसेनेशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

सत्तेत सामावून घेण्यासाठी शिवसेनेसोबत उद्यापासून चर्चा - मुख्यमंत्री
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - शिवसेना हा केंद्रातील भाजपाप्रणीत एनडीएतील घटक पक्ष असून राज्यातही शिवसेनेला सत्तेत सामावून घ्यायची भाजपाची तयारी आहे असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. यासंदर्भात उद्यापासून शिवसेनेसोबत पुन्हा चर्चेचा सुरुवात होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.
शिवसेना - भाजपा युती होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली असून भाजपा नेते शिवसेनेला सोबत घेण्याची तयारी दर्शवत आहेत. तर शिवसेना सक्षम विरोधी पक्षाची भूमिका निभावेल असे सेना नेत्यांनी सांगितले होते. यापार्श्वभूमीवर गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला सत्तेत सामील करुन घेण्याचे विधान केले आहे. सत्तेत आम्ही एकत्र यावे असे दोन्ही पक्षांना वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले. सत्तेत सामील करुन घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दुरध्वनीद्वारे चर्चाही केली. भाजपाकडून चंद्रकांत पाटील आणि धर्मेंद्र प्रधान यांना चर्चेचे सर्वाधिकार असून शिवसेनेसोबतच्या चर्चेत सकारात्मक तोडगा निघेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.