‘डिस्कव्हरी’चा तोतया संचालक अटकेत
By Admin | Updated: April 4, 2015 04:51 IST2015-04-04T04:51:57+5:302015-04-04T04:51:57+5:30
डिस्कव्हरी चॅनेलचा क्रिएटिव्ह डायरेक्टर असल्याचे सांगून जंगलात शूटिंग करण्याच्या बहाण्याने भाडेतत्त्वावर महागडे कॅमेरे देणाऱ्यांना फसविणाऱ्या महाठगाला

‘डिस्कव्हरी’चा तोतया संचालक अटकेत
मुंबई : डिस्कव्हरी चॅनेलचा क्रिएटिव्ह डायरेक्टर असल्याचे सांगून जंगलात शूटिंग करण्याच्या बहाण्याने भाडेतत्त्वावर महागडे कॅमेरे देणाऱ्यांना फसविणाऱ्या महाठगाला मनाली येथून अटक केली आहे. मूळचा गुजरातचा असलेल्या मिलिंद भरतकुमार भट (२७) या आरोपीविरोधात मुंबईसह, दिल्ली, गोवा, चेन्नई या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. सायन पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे हा ठग पोलिसांच्या हाती सापडला.
डिस्कव्हरी चॅनेलचा क्रिएटिव्ह डायरेक्टर बनून फिरणाऱ्या भटने इंटरनेटच्या माध्यमातून मुंबईसह दिल्ली, चेन्नई आणि गोव्यामध्ये भाडेतत्त्वावर कॅमेरे देणाऱ्यांचे पत्ते मिळवले. गेल्या दोन वर्षांपासून अशा प्रकारे डिस्कव्हरी चॅनलसाठी जंगलात शूटिंग करण्याच्या बहाण्याने भटने १४ डिसेंबरला एका खासगी वृत्तवाहिनीसह, बोरीवलीतील एका व्यक्तीकडून तब्बल २१ लाख किमतीचे कॅमेरे भाडेतत्त्वावर घेऊन विकले. या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात २० फेब्रुवारीला भटविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मूळचा गुजरातच्या कच्छमधील रहिवासी असलेला भट हा कुटुंबासह विलेपार्ले येथे राहण्यास होता. मास मीडियाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर या ठगाने एका तरुणीशी प्रेमविवाह केला. पत्नीला घेऊन वेगळे राहण्याच्या हट्टापोटी कुंची कुर्वे टोळीकडून १० लाख रुपये उधार घेतले होते. ते परत करण्यासाठी भटने पहिल्यांदा भाडेतत्त्वावर कॅमेरे घेऊन एका जाहिरात कंपनीचे काम मिळवले. मात्र ते वेळेत पूर्ण न झाल्याने भाड्याचे कर्ज त्याच्या डोक्यावर झाले. हे कर्ज फेडण्यासाठी भटने हे कॅमेरे विकून पळ काढला. मात्र त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार न झाल्याने त्याने पैसे कमविण्यासाठी हाच अवैध व्यवसाय सुरू केला. १० हजार रुपयांपासून २५ हजार रुपये महिना भाडेतत्त्वावर हा ठग कॅमेरे घेत होता. (प्रतिनिधी)