दोषींनी मागितली शिक्षेत सवलत
By Admin | Updated: July 30, 2016 03:29 IST2016-07-30T03:29:57+5:302016-07-30T03:29:57+5:30
औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणी दोषी असलेल्या १२ आरोपींनी आपले कृत्य जन्मठेपेच्या शिक्षेएवढे भयानक नसून आपण केवळ शस्त्रसाठा आणि आरडीएक्सची वाहतूक करण्याचे काम पार पाडले

दोषींनी मागितली शिक्षेत सवलत
मुंबई : औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणी दोषी असलेल्या १२ आरोपींनी आपले कृत्य जन्मठेपेच्या शिक्षेएवढे भयानक नसून आपण केवळ शस्त्रसाठा आणि आरडीएक्सची वाहतूक करण्याचे काम पार पाडले आहे. त्यामुळे कटाच्या सूत्रधाराप्रमाणे आपल्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात येऊ नये. कमीतकमी शिक्षा देण्यात यावी, अशी विनंती दोषींतर्फे त्यांच्या वकिलांनी विशेष ‘मकोका’ न्यायालयाला केली. मात्र सरकारी वकिलांनी या दोषींना कोणती शिक्षा ठोठावण्यात यावी, यावर युक्तिवाद करण्यासाठी एक दिवसाची मुदत मागितली. विशेष न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत शनिवारी सरकारी वकिलांना शिक्षेबाबत युक्तिवाद करण्याचे
निर्देश दिले.
या प्रकरणातील १२ दोषींच्या वकिलांनी शिक्षेबाबत युक्तिवाद पूर्ण केला. सरकारी वकील वैभव बगाडे यांनी दोषींच्या शिक्षेबाबत युक्तिवाद करण्यास एका दिवसाची मुदत मागितली. विशेष ‘मकोका’ न्यायालयाचे न्या. श्रीकांत अणेकर यांनी त्यांची विनंती मान्य करत शनिवारी यावर सरकारी वकिलांना युक्तिवाद करण्याचे निर्देश दिले.
दोषींतर्फे अॅड. युग चौधरी यांनी युक्तिवाद केला. ‘राजकीय नेत्यांची हत्या करण्याचा जरी दोषींचा कट असला तरी त्यांनी पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर गोळीबार केला नाही. केलेल्या कृत्याचा त्यांना पश्चात्ताप झाला आहे. त्यामुळे त्यांना १० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात यावी,’ असा युक्तिवाद त्यांनी केला. (प्रतिनिधी)
कमी शिक्षेची मागणी
- अॅड. चौधरी यांनी १९९३च्या बॉम्बस्फोटाचे उदाहरण दिले. १९९३च्या बॉम्बस्फोटातील दोषींना विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेत कपात करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
या खटल्यातील दोषींनी कट रचलेला नाही. त्यामुळे त्यांना मुख्य सूत्रधाराप्रमाणे किंवा कट रचणाऱ्यांप्रमाणे शिक्षा देऊ नये, असा युक्तिवाद बचावपक्षाच्या वकिलांनी केला.