पाणीपट्टी थकबाकीदारांच्या नळ जोडण्या खंडित करा : आयुक्तांचे आदेश
By Admin | Updated: November 13, 2016 17:13 IST2016-11-13T17:13:38+5:302016-11-13T17:13:38+5:30
पाणी कराची थकबाकी वसुलीपोटी पाणीपट्टी थकबाकीदारांच्या नळ जोडण्या त्वरित खंडित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले

पाणीपट्टी थकबाकीदारांच्या नळ जोडण्या खंडित करा : आयुक्तांचे आदेश
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 13 - पाणी कराची थकबाकी वसुलीपोटी पाणीपट्टी थकबाकीदारांच्या नळ जोडण्या त्वरित खंडित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले असून कालपासून वागळे, रायलादेवी आणि दिवा प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. दरम्यान जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या चलनामध्ये महापालिकेची विविध देयके भरण्याचा शेवटचा दिवस असून, नागरिकांनी आपली देयके त्वरीत भरावीत असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
पाणीपट्टी वसूल करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने वागळे इस्टेट, रायलादेवी प्रभाग समिती आणि दिवा प्रभागामधील पाणी कर थकबाकीदारांची नळ संयोजने खंडित करण्याची कारवाई कालपासून हाती घेण्यात आली आहे. या कारवाई अंतर्गत जवळपास १२० नळ संयोजने खंडीत करण्यात आली आहेत.
उद्या जुन्या चलनाच्या माध्यमातून महापालिकेची देयके भरण्याचा शेवटचा दिवस असून नागरिकांनी आपली थकबाकी न भरल्यास दिनांक १५ नोव्हेंबरपासून मोठ्या प्रमाणात नळ संयोजने खंडीत करण्याची कारवाई हाती घेण्यात येणार आहे. दरम्यान आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी महापालिकेच्या सर्व भरणा केंद्रांवर भेट देऊन कामाची पाहणी केली. सोमवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी रात्री १२ पर्यंत ही भरणा केंद्रे सुरू राहणार आहेत.