बेशिस्त चालकांना शिस्तीचा ब्रेक
By Admin | Updated: October 20, 2016 01:41 IST2016-10-20T01:41:18+5:302016-10-20T01:41:18+5:30
पाच तासांच्या धिंगाण्यांनतर वल्लभनगर आगारात येणाऱ्या सर्व एसटीचालकांची मद्यपान तपासणी चाचणी करण्यास सुरुवात झाली

बेशिस्त चालकांना शिस्तीचा ब्रेक
पिंपरी : मद्यपान करून स्वारगेट आगारातून भुम-बोरिवली एसटी गुरुवारी (१३) संध्याकाळी साडेचारच्या सुमारास वल्लभनगरच्या बसस्थानकात पोहचविणाऱ्या लिंबराज साहेबराव चव्हाण या चालकाच्या पाच तासांच्या धिंगाण्यांनतर वल्लभनगर आगारात येणाऱ्या सर्व एसटीचालकांची मद्यपान तपासणी चाचणी करण्यास सुरुवात झाली आहे़
गुरुवारी चव्हाण या एसटीचालकाने ३८ प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बेदरकारपणे एसटी चालवत वल्लभनगर आगारात एसटी पोहचविली होती़ त्या पार्श्वभूमीवर आगारात विविध ठिकाणांहून येणाऱ्या चालकांची मद्यपान तपासणी यत्रंणा सुरू करण्यात आली आहे़ त्यामुळे आता व्यसन करून प्रवाशांचा जीव धोक्यात घालून एसटी चालविणाऱ्या चालकांना कारवाईस सामोरे जावे लागणार आहे़
वल्लभनगर आगारात दररोज महाराष्ट्रभरातील विविध आगारांतून एसटी दाखल होत असतात़ राज्यातील सर्वांत मोठी उद्योगनगरी म्हणून पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणांहून नागरिक येथे वास्तव्यास आहेत़ अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपल्याने शहरातील अनेक नागरिक आपल्या गावी जाण्यासाठी एसटीचा पर्याय निवडतात़
मात्र, गेल्या काही महिन्यांत एसटीच्या बाबतीत चाकाचे नट बोल्ट निसटणे, मद्यपान करून एसटी चालविणे अशा घटना घडल्यामुळे राज्यातील प्रत्येक आगार व्यवस्थापकांनी प्रवाशांची काळजी घेण्यासाठी कठोर उपाययोजना राबवाव्या, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे़ एसटी महामंडळाच्या विशेष पथकाकडून मद्यपान तपासणी यंत्रणा कारवाई करीत असते़ त्यामुळे नव्याने वल्लभनगरच्या आगारात मद्यपी चालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे़ परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी चालकांच्या कार्यशाळेत एसटीच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्यतेमुळे चालकांवर ताण वाढत आहे, असे खडे बोल सुनावले होते़ (प्रतिनिधी)
>एसटी महामंडळाच्या वतीने प्रत्येक आगारामार्फ त विशेष पथकाकडून नियमितपणे मद्यपान केलेल्या चालकांवर कारवाई केली जाते़ वल्लभनगरच्या आगारात येणाऱ्या एसटीचालकाची मद्यपान तपासणी करण्यात येणार आहे़ तपासणीत कोणी दोषी आढळल्यास कडक कारवाई करणार आहे़
- अनिल भिसे, वल्लभनगर आगार व्यवस्थापक