आपत्ती प्रतिसाद दल स्थापन
By Admin | Updated: July 31, 2014 04:31 IST2014-07-31T04:31:59+5:302014-07-31T04:31:59+5:30
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) धर्तीवर महाराष्ट्राकरिता स्वतंत्र राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन तुकड्यांची स्थापना करण्याचा निर्णय

आपत्ती प्रतिसाद दल स्थापन
मुंबई : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) धर्तीवर महाराष्ट्राकरिता स्वतंत्र राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन तुकड्यांची स्थापना करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आपत्तीच्या वेळी या तुकड्या तातडीने मदतीसाठी पोहोचतील.
राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन तुकड्यांसाठी ४२८ पदे निर्माण करण्यात येणार असून, हे काम मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती करेल. राज्यात सातत्याने पूर, भूकंप, चक्रीवादळ तसेच पाणीटंचाई अशा नैसर्गिक आपत्ती येतात. प्रत्येक वर्षी राज्यातील १५ ते २० जिल्ह्यांना पूर, अतिवृष्टीचा तडाखा बसत असतो. विदर्भातील काही जिल्हे आणी मराठवाड्याचा काही भाग, त्याचप्रमाणे कोयना, रायगड, सातारा, ठाणे हा भाग दुष्काळप्रवण आणि भूकंपप्रवण क्षेत्रात मोडतो.
लातूरमध्ये झालेल्या भूकंपामुळे अपरिमित हानी झाली होती. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी विदर्भातील जिल्ह्यामध्ये पुराचा तडाखा बसला़ त्या वेळी नागरिकांना हलविण्यासाठी पुणे येथील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची मदत घेण्यात आली होती. सध्या ही तुकडी पुणे, तळेगाव दाभाडे येथे असल्याने त्यांना आपत्तीस्थळी पोहचायला खूप वेळ लागतो.
ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन दोन स्वतंत्र तुकड्या निर्माण करण्यात येतील. प्रत्येक कंपनीत एकूण तीन टीम्स असून, प्रत्येक टीममध्ये ४५ अधिकारी व कर्मचारी असतील. (विशेष प्रतिनिधी)