नियंत्रण कक्षात नेत्यांचे ‘डिझास्टर’!
By Admin | Updated: June 19, 2015 23:03 IST2015-06-19T23:03:45+5:302015-06-19T23:03:45+5:30
सतत खणखणणारे तक्रारींचे फोन, त्यानुसार आवश्यक मदत यंत्रणा पाठविण्यासाठी समन्वय आणि मर्यादित कर्मचारीवर्ग यामुळे आपत्कालिन नियंत्रण कक्षावरील ताण

नियंत्रण कक्षात नेत्यांचे ‘डिझास्टर’!
मुंबई: सतत खणखणणारे तक्रारींचे फोन, त्यानुसार आवश्यक मदत यंत्रणा पाठविण्यासाठी समन्वय आणि मर्यादित कर्मचारीवर्ग यामुळे आपत्कालिन नियंत्रण कक्षावरील ताण प्रत्येक क्षणाला वाढत होता़ त्यात परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच हजेरी लावल्यानंतर जागे झालेल्या शिवसेना नेते व मंत्री महोदयांनी मुख्यालय गाठले़ नियंत्रण कक्षाला भेट देण्याच्या नेत्यांच्या चढाओढीमुळे त्यांची बडदास्त राखण्यात पालिका अधिकाऱ्यांची मात्र तारंबळ उडाली़ २००५ मध्ये मुंबईवर ओढावलेल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तत्कालिन मुख्य सचिवांनी पालिका नियंत्रण कक्षात हजेरी लावली होती़ मात्र पावसाची माहिती घेण्यासाठी सकाळीच आपत्कालिन नियंत्रण कक्षात हजर होणारे देवेंद्र फडणवीस हे पहिलेच मुख्यमंत्री़ दुपारी १२़३० च्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी नियंत्रण कक्षास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला़ त्यांच्याबरोबर राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, प्रधान सचिव प्रवीण परदेशी उपस्थित होते़ त्यांच्या हजेरीची कुणकुण लागताच वर्धापन दिनाचे कार्यक्रम रद्द करुन शिवसेनेचे नेतेही नियंत्रण कक्षात रीघ लावू लागले़ युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री दीपक सावंत, परिवहन मंत्री दिवाकर रावते, शिक्षण मंत्री विनोद तावडे, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार अशी नेत्यांची चढाओढच सुरु झाली़ पावसाचा आढावा घेण्यासाठी आयुक्त अजय मेहता स्वत: रस्त्यावर उतरले होते़ रेल्वे सेवा ठप्प असल्याने नियंत्रण कक्षातील ३७ पैकी १७ च कर्मचारी हजर होते़ तरीही कसंबसं नियंत्रण करणाऱ्या या कक्षावर नेत्यांच्या रुपाने डिझास्टरच ओढावल्याचे चित्र मात्र दिसून आले़ त्यांना पावसाचा आढावा देण्यासाठी नियंत्रण कक्षाचा ताण वाढला होता़ ही चढाओढ निवडणुकीसाठी? सत्तेवर एकत्रित असले तरी शिवसेना-भाजपामध्ये श्रेयाची लढाई मात्र सुरुच आहे़ निवडणूक स्वबळावर लढविण्याच्या तयारीत असलेल्या भाजपाने आपला एकला चलो कारभार सुरु केला आहे़ त्यामुळे उभय पक्षांचे पाहणी दौरे, कार्यक्रम, प्रकल्पाचे उद्घाटन स्वतंत्रच केले जात आहेत़ पावसाने मुंबईकरांची दैना उडवल्यामुळे सत्ताधारी टीकेचे धनी बनले आहेत़ मात्र यातही आपली बाजू सावरुन भाजपाने मित्रपक्षाला एकटे पाडण्याची खेळी सुरु केली आहे़ नियंत्रण कक्षाला नेत्यांची ही भेट २०१७ च्या निवडणुकीचीच तयारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे़