खासदारांच्या प्रभागात भाजी मंडईमुळे गैरसोय
By Admin | Updated: July 20, 2016 01:49 IST2016-07-20T01:49:42+5:302016-07-20T01:49:42+5:30
विविध विकासकामे केल्याचे लोकप्रतिनिधींकडून सांगितले जात असले, तरी गणेशनगर प्रभागातील भाजी मंडईचा प्रश्न अद्याप कायम आहे.

खासदारांच्या प्रभागात भाजी मंडईमुळे गैरसोय
पिंपरी : विविध विकासकामे केल्याचे लोकप्रतिनिधींकडून सांगितले जात असले, तरी गणेशनगर प्रभागातील भाजी मंडईचा प्रश्न अद्याप कायम आहे. त्यामुळे भर चौकातच भाजी मंडई भरत असून, यामुळे रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असल्याची स्थिती गणेशनगर प्रभागात पाहायला मिळत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील गणेशनगर या ५१ क्रमांकाच्या प्रभागाचे प्रतिनिधित्व श्रीरंग बारणे आणि माया बारणे हे करतात. सुमारे २२ हजार इतकी लोकसंख्या असलेल्या या प्रभागात बेलठिकानगर, गणेशनगर, लक्ष्मणनगर, गुजरवस्ती, डांगै चौक, सोळा नंबर बस स्टॉप आदी भाग येतो. या प्रभागामध्ये दाट लोकवस्तीचा परिसर अधिक आहे. यासह डांगे चौकासारखा महत्त्वाचा भागही याच प्रभागात येतो. या चौकातून ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
किवळे ते औंध हा बीआरटीएस मार्ग डांगे चौकातूनच जातो. मात्र, या चौकात असलेले भाजीविक्रेते तसेच इतर विक्रेत्यांमुळे चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे जलद प्रवासी वाहतुकीसाठी असलेली बीआरटीएस सेवा या चौकात अडखळते. यासह इतर वाहनांनाही गर्दीतून वाट काढताना कसरत करावी लागते. येथील अतिक्रमणांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या प्रभागातील मुख्य रस्ते अतिक्रमणांमुळे गायब झाले आहेत. बीआरटीएस मार्गिका झाल्यानंतर हा रस्ता प्रशस्त झाला. मात्र, रस्त्यावरच दुकाने थाटल्याने प्रशस्त रस्ता होऊनही त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे दिसून येते. यामुळे प्रभागातील मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीचा प्रश्न जटिल बनला आहे. रस्त्यावरील अतिक्रमणांचा वाहनचालकांसह नागरिकांनाही रोजच सामना करावा लागत आहे. अनेक दिवसांपासून भेडसावत असलेला हा अतिक्रमणांचा प्रश्न कधी सुटणार, असा मुद्दा उपस्थित होत आहे. (वार्ताहर)