अपंग पतीला ठाण्यातील कब्रस्थानात सोडले !
By Admin | Updated: February 14, 2015 03:54 IST2015-02-14T03:54:44+5:302015-02-14T03:54:44+5:30
अपंग पतीला रूग्णालयात उपचारासाठी नेण्याच्या बहाण्याने त्याच्या कुटुंबियांनी थेट ठाणे येथील एका कब्रस्थानात नेऊन सोडून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली

अपंग पतीला ठाण्यातील कब्रस्थानात सोडले !
धुळे : अपंग पतीला रूग्णालयात उपचारासाठी नेण्याच्या बहाण्याने त्याच्या कुटुंबियांनी थेट ठाणे येथील एका कब्रस्थानात नेऊन सोडून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे़
शहर पोलिसांत गुरुवारी याप्रकरणी अपंग व्यक्तीची पत्नी, मुलगा, मेव्हण्यासह चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे़ बारापत्थर चौकाजवळ राहणारे मोहंमद हनीफ अपंग आहेत. त्यांना पत्नी महेरुसिया, मुलगा अब्दुल अजीज यांच्यासह चार जण १९ जानेवारीला रुग्णवाहिकेने घेऊन गेले व ठाणे येथील राबोडी कब्रस्थानात सोडून दिले. हनीफ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेरुसिया, अब्दुल अजीज, मोहंमद अली, रुग्णवाहिका चालक मकसूदअली (सर्व रा़ बारापत्थर, धुळे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
मोहंमद हनीफ काम करत असताना एका इमारतीवरून पडले होते़ त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यानंतर ते अपंग झाले़ ते एका शाळेसमोर भिक्षाही मागू लागले होते. हनीफ अपंग झाल्यामुळे कुटुंबियांना त्यांचे ओझे वाटू लागले होते. त्यांच्या भिक्षा मागण्याने कुटुंबियांना कमीपणा वाटत होता. त्यातून कुटुंबातील सदस्यांनी त्यांना घराबाहेर काढण्यासाठी कटकारस्थान रचले.