नाट्यगृहातील सुविधा कलावंतांसाठी अपुऱ्या
By Admin | Updated: August 4, 2015 00:57 IST2015-08-04T00:57:48+5:302015-08-04T00:57:48+5:30
सांस्कृतिक संचनालनातर्फे राज्यातील सुमारे १२५ नाट्यगृहांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, कलावंतांसाठी असलेल्या सुविधा अपुऱ्या असल्याचा निष्कर्ष

नाट्यगृहातील सुविधा कलावंतांसाठी अपुऱ्या
पुणे : सांस्कृतिक संचनालनातर्फे राज्यातील सुमारे १२५ नाट्यगृहांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, कलावंतांसाठी असलेल्या सुविधा अपुऱ्या असल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे. समितीने संबंधित अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे. अहवालात नोंदवण्यात आलेल्या नाट्यगृहातील त्रुटींची दखल घेऊन राज्य सरकार त्यानुसार सुधारण करणार आहे.
सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच यासंदर्भात बैठक होणार आहे. राज्यातील सर्व नाट्यगृहांच्या माहितीसाठी एक संकेतस्थळ निर्माण करण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर पावले उचलली जाणार आहेत, अशी माहिती सांस्कृतिक संचालक अजय अंबेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
नाट्यगृहांची स्थिती, वास्तुरचनेच्या दृष्टिकोनातून असलेल्या उणिवा, सभागृहांचेच नाट्यगृहामध्ये करण्यात आलेले रूपांतर या सर्वच गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी शासनाने राज्यातील नाट्यगृहांच्या सर्वेक्षणाची मोहीम पाच महिन्यांपूर्वी हाती घेतली होती. त्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूरसह राज्यातील तब्बल १२५ नाट्यगृहांची पाहणी करण्यात आली. त्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
नाट्यगृहांच्या सर्वेक्षणाविषयी बोलताना शासनाचे मुख्य समन्वयक नाबिद इनामदार म्हणाले, नाट्यगृह तर प्रेक्षकांनी भरतात मात्र कलावंतांना रंगमंच अपुरा पडतो. एकाच ठिकाणी दोन नाटकांचे प्रयोग असल्यास एखाद्या संस्थेला मेकअप रूमच उपलब्ध होत नाही. अग्निशमन रोधक यंत्रणा नाही, चांगल्या ध्वनी-प्रकाश योजनेचा अभाव अशा अनेक उणिवा आहेत. नाट्यगृहांमध्ये अधिक सुविधा कशा देता येतील, त्यांचे तिकीट दर काय असावेत याबाबत अहवालात काही सूचना करण्यात आल्या असल्याचे इनामदार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)