पोस्टल सवलतीतून अपंगांना वगळले
By Admin | Updated: December 20, 2014 03:16 IST2014-12-20T03:16:00+5:302014-12-20T03:16:00+5:30
पोस्टल विभागाने घेतलेल्या विविध पदांच्या भरतीत दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेत पीएच १, २, ३ गटातील अपंग उमेदवारांना सवलतीमधून वगळण्यात आले

पोस्टल सवलतीतून अपंगांना वगळले
मुंबई : पोस्टल विभागाने घेतलेल्या विविध पदांच्या भरतीत दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेत पीएच १, २, ३ गटातील अपंग उमेदवारांना सवलतीमधून वगळण्यात आले आहे. इतर प्रवर्गांना सवलत दिली जात असताना अपंग उमेदवारांवर अन्याय होत असल्याने उमेदवारांनी विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पोस्टल विभागाच्या वतीने ११ मे रोजी विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. पहिल्या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची महाराष्ट्र सर्कलसाठी ८ ते १३ नोव्हेंबर दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत टाईपिंग करू शकत नसलेल्या उमेदवारांना सवलत देण्यात आली. मात्र जे टायपिंग करू शकतात, त्या अपंग पीएच १, २, ३ गटातील उमेदवारांना कोणतीही सवलत देण्यात आली नसल्याने उमेदवारांनी विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. पेपर दोनच्या पात्रतेसाठी ओबीसींना ३७ टक्के, एससी/एसटींना ३३ टक्क्यांची सवलत असताना अपंगांना खुल्या प्रवर्गाप्रमाणे ४० टक्के गुण मिळवावे लागणार आहेत. यामुळे अपंग उमेदवारांवर अन्याय होत असल्याची भावना उमेदवारांनी व्यक्त केली आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या इतर विभागाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये अपंगांना गुणांमध्ये सवलत दिली जाते. मात्र, या परीक्षेत अपंगांना सवलत नाकारण्यात आल्याने उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात पोस्टल विभागाकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही. (प्रतिनिधी)