‘तो’ संचालक सीबीआयच्या जाळ्यात
By Admin | Updated: August 1, 2016 04:13 IST2016-08-01T04:13:21+5:302016-08-01T04:13:21+5:30
५० हजार रुपयांची लाचेची मागणी करून त्यातील दहा हजार रुपये घेताना चिकलठाणा विमानतळ प्राधिकरण संचालक अलोक वार्ष्णेय यास शनिवारी सीबीआयने रंगेहाथ पकडले

‘तो’ संचालक सीबीआयच्या जाळ्यात
औरंगाबाद : मुंबईस्थित एका ठेकेदारास कंत्राट देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाचेची मागणी करून त्यातील दहा हजार रुपये घेताना चिकलठाणा विमानतळ प्राधिकरण संचालक अलोक वार्ष्णेय यास शनिवारी सीबीआयने रंगेहाथ पकडले. त्याला रविवारी विशेष न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३ आॅगस्टपर्यंत सीबीआय कोठडी ठोठावली.
याविषयी सीबीआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिकलठाणा विमानतळावर नियमित फ्लाईटशिवाय अन्य विमानेही ये-जा करतात. या विमानांना विमानतळावर खासगी सेवा देण्यासाठी कंत्राट मिळावे, यासाठी मालाड (मुंबई) येथील एका कंपनीने विमानतळ प्राधिकरणाकडे परवानगी मागितली होती. शिवाय नॉन-शेड्युल्ड विमानांना सेवा देण्यासाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांना विमानतळावर येण्या-जाण्यासाठी परवानगी मिळावी, अशी विनंतीही केली होती. हे कंत्राट देण्यासाठी अलोक वार्ष्णेय याने या कंपनीकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती. एवढेच नव्हे तर, प्रती विमान विशिष्ट रक्कम द्यावी लागेल, असेही या कंपनीला सांगितले होते. याबाबत कंपनीने सीबीआयकडे तक्रार नोंदवली. (प्रतिनिधी)
>वार्ष्णेय याची विविध राज्यांत संपत्ती
वार्ष्णेय याला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयने एकाच वेळी चिकलठाणा विमानतळावरील त्याचे कार्यालय आणि निवासस्थानाची झडती घेतली. त्याचे उत्तर प्रदेशातील वाराणसी तसेच नोएडा आणि हरियाणा राज्यातील गुडगाव येथे घर आहे. या घरांचीही सीबीआयच्या दुसऱ्या पथकाने झाडाझडती घेतली. शिवाय त्यांनी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. याबाबतची महत्त्वाची कागदपत्रे सीबीआयच्या हाती लागली आहेत.