बिबट्याचा महिनाभरापासून मुक्त संचार !
By Admin | Updated: June 8, 2016 02:09 IST2016-06-08T02:09:28+5:302016-06-08T02:09:28+5:30
खामगाव वन विभाग सुस्त; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

बिबट्याचा महिनाभरापासून मुक्त संचार !
सुहास वाघमारे / नांदुरा(जि. बुलडाणा)
मागील महिनाभरापासून शहराजवळील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या पाइप फॅक्टरीत बिबट्याचा मुक्त संचार असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याला जाळ्य़ात अडकवण्यासाठी वनविभागाने पिंजरे लावले तरीही बिबट्या यामध्ये अडकत नसून वन विभागाचे अधिकारीही सुस्त असल्याचे चित्र आहे.
महिन्यापूर्वी ८ मे रोजी नांदुरा शहराजवळील वडी शिवारातील पाइप फॅक्टरी परिसरात काही मजूर व परिसरातील शेतकर्यांना पहिल्यांदा बिबट्या दिसला होता. त्यांनी याबाबत नगरसेवक अनिल सपकाळ यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी वन विभागाला कळविले होते. यानंतर वन विभागाची चमू या पाईप फॅक्टरी परिसरात दाखल झाली होती. वन विभागाने कॅमेरे व पिंजरे परिसरात बसवून काही दिवस कर्मचारी दिवस-रात्र तैनात केले होते; मात्र दहा ते बारा दिवसांनी बिबट्या परिसरात दिसून येत नसल्याचे सांगून वन विभागाचे कर्मचारी पाइप फॅक्टरी परिसरात सोडून निघून गेले.
दरम्यान, ३ जूनपासून दररोज बिबट्या पाइप फॅक्टरी परिसरात दृष्टीस पडत आहे. वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले; आता मात्र अधिकारी सुस्त असून यामुळे धास्तावलेल्या नागरिकांनी वन विभागाप्रति नाराजी व्यक्त होत आहे.