'दिलवाले'ला मनसेचा विरोध नाही - राज ठाकरे
By Admin | Updated: December 15, 2015 16:29 IST2015-12-15T14:53:39+5:302015-12-15T16:29:32+5:30
'दिलवाले' चित्रपट पाहू नये ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे मंगळवारी दुपारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

'दिलवाले'ला मनसेचा विरोध नाही - राज ठाकरे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - 'दिलवाले' चित्रपट पाहू नये ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे मंगळवारी दुपारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दिलवाले चित्रपटाला आता मनेसचा विरोध राहिलेला नाही.
महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त शेतक-याऐवजी चेन्नईतल्या पूरग्रस्तांना १ कोटींची मदत करणा-या शाहरुख खानच्या आगामी दिलवाले चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन मनसेच्या चित्रपट शाखेने केले होते. शाहरुखचा दिलवाले पहायला महाराष्ट्रातील जनतेने चित्रपटगृहात जाऊ नये असे मनसेने म्हटले होते.
शाहरुखचा दिलवाले पाहण्याऐवजी तो निधी नाना पाटेकर-मकरंद अनासपुरे यांच्या नाम संस्थेला द्या अशी भूमिका मनसेच्या चित्रपट शाखेने घेतली होती. मात्र दिलवालेला विरोध ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे राज यांनी स्पष्ट केले आहे.
रोहित शेटटीच्या दिलवाले चित्रपटातून शाहरुख-काजोल ही हिट जोडी पुन्हा एकदा पडद्यावर येत आहे. बाजीगर, डीडीएलजी, कभी खुषी कभी गम, माय नेम इज खान असे हिट चित्रपट या जोडीच्या नावावर आहेत.