खड्ड्यांची उपराजधानी!

By Admin | Updated: August 25, 2014 01:20 IST2014-08-25T01:20:22+5:302014-08-25T01:20:22+5:30

उपराजधानीचा चेहरामोहरा बदलत असतानाच येथील रस्त्यांचे काय, असा प्रश्न निर्माण होतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत नागपूर हे सुंदर रस्त्यांसाठी ओळखले जात होते. आज हेच रस्ते नागपूर शहराच्या

The digging of the potholes! | खड्ड्यांची उपराजधानी!

खड्ड्यांची उपराजधानी!

नागपूरकर त्रासले : मेट्रो सिटी होणार तरी कशी?
नागपूर : उपराजधानीचा चेहरामोहरा बदलत असतानाच येथील रस्त्यांचे काय, असा प्रश्न निर्माण होतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत नागपूर हे सुंदर रस्त्यांसाठी ओळखले जात होते. आज हेच रस्ते नागपूर शहराच्या चेहऱ्यावर न शोभून दिसणारे डाग बनले आहेत. उखडलेले रस्ते आणि खड्ड्यांनी सामान्यजन त्रासले आहेत. सध्याच्या रस्त्यांची तर एका दिवसाच्या पावसातच पोल उघडली जात आहे. या रस्त्यांची दयनीय अवस्था अशीच राहिली तर नागपूर शहर मेट्रो सिटी होणार तरी कशी, हा प्रश्नच आहे.
पंचशील चौक ते धंतोली पोलीस ठाणे
पंचशील चौकापासून धंतोली पोलीस ठाण्याकडे जाताना मेहाडिया चौकाआधी तीन मोठे खड्डे दुचाकी वाहनांसाठी जीवघेणे ठरत आहे. मेहाडिया चौकानंतर ठाण्याकडे जाताना दुचाकी चालविणे अवघड काम आहे. लक्ष ठेवून खड्ड्याला वळसा घालावा लागतो. चालकाला खड्ड्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आशीर्वाद टॉकीजपुढे येतो. या मार्गावर ये-जा करताना गाडीचा वेग थोडा जास्त असला तर अपघात झालाच म्हणून समजा.
बैद्यनाथ चौक ते अशोक चौक
बैद्यनाथ चौकातून अशोक चौकाकडे जाताना चक्क खड्ड्यातून मार्ग काढावा लागतो. या मार्गावरील सर्वच आॅटोमोबाईल शोरूमसमोर संपूर्ण रस्ताच उखडला आहे. मनपाच्या कार्यशाळेसमोर मोठे खड्डे पडले आहेत. गेल्या पाच वर्षांपासून या रस्त्यांची स्थिती दयनीय आहे. अनेकांचे पाठीचे आजार वाढले आहेत. आंदोलन, मोर्चे, वरिष्ठांना निवेदने आदीनंतरही प्रशासनाचे डोळे उघडले नाहीत. सिमेंट रस्ता होणार असल्याचे सांगून बोळवण केली जाते. पण सत्य स्थिती अशी आहे की, रेशीमबाग चौकापासून पुढे २०० मीटरचा सिमेंट रस्ता पूर्ण होण्यासाठी तीन वर्षे लागली. अद्यापही काम सुरूच आहे. कामाचा वेग पाहता बैद्यनाथ चौक ते अशोक चौकापर्यंत रस्ता दुपदरी होण्यासाठी कदाचित दहा वर्षे लागतील. आधी रस्त्यावर डांबरीकरण करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. अशोक चौकातून रेशीमबाग चौकाकडे जाताना जागोजागी खड्डे पडले आहेत. लोकांची शाळेसमोर एक मार्ग सिमेंटचा आहे तर दुसरा मार्ग चक्क खड्ड्यांचा आहे. याशिवाय रेशीमबाग चौकाकडून जुनी शुक्रवारी चौकादरम्यान वाहतूक एकपदरी असल्याने या मार्गावर अपघात नेहमीचीच बाब आहे. या सिमेंट रस्त्याने अनेकांचे जीव घेतले आहे.
अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांना त्रास
गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांची कायम वर्दळ असते. परंतु बाजूच्या भैयासाहेब आंबेडकर चौकात खड्डे असल्याने लोकांना त्रास होतो. रेशीमबाग चौकाच्या काही अंतरावरील केशव द्वारापुढे खड्डा आहे. जनरल आवारी चौकातील शिवसेना कार्यालयापुढे मोठा खड्डा आहे. मनपा सत्तेतील प्रमुख घटकपक्षाच्या कार्यालयापुढे असलेला खड्डा तातडीने बुजवला जात नसल्याने शहरातील खड्डे कसे बुजवले जातील असा प्रश्न शहरातील नागरिक ांना पडला आहे. आवारी चौक ते क्रीडा चौकादरम्यानच्या मार्गावरील सांस्कृतिक लॉनपुढे खड्डे पडलेले आहे. बाजूच्या क्रीडा चौकाचीही अशीची अवस्था आहे.
अजनी चौक ते अजनी स्टेशन
खड्ड्यांची संख्या मोजताही येणार नाहीत एवढे खड्डे पाहायचे असेल तर अजनी चौकापासून अजनी स्टेशनपर्यंत चक्कर मारा. अजनी स्टेशनवरून निघाल्यानंतर जलसंपदा विभागाच्या कार्यालयाच्या पुढे केवळ खड्डेच दिसतील. चारचाकीत असाल तर थोडे धक्के जाणवतील. दुचाकीवर जाल तर गाडी खड्ड्यांनीच चाललेली दिसेल. थोडे वेगात जाल तर एकतर पाठीच्या मणक्याला इजा होईल नाहीतर मागे बसलेला उसळून खाली पडेल. पाऊस पडल्यानंतर तर खड्ड्यातून जाताना काय होईल, हे सांगताच येणार नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून खड्ड्यांची अशी अवस्था असताना कुणालाही सोयरसुतक नाही. पुढे गेल्यानंतर वर्धा मार्ग लागतो. राजीवनगर चौकातून साईमंदिराकडे जाताना पहिल्या सिग्नलनंतरचा रस्त्याची दुरुस्तीही अर्धवटच झाली. एक पट्टा डांबराचा पुढे मागे खड्ड्यांचा अशी सोय पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या निमित्ताने करून देण्यात आली. पण, या रस्त्याने साईमंदिरापासून जेलपर्यंत येईपर्यंत डाव्या बाजूने अनेक छोटे खड्डे चुकवत प्रवास करावा लागतो.
लोहापूल
लोहापूल चौकातील बसस्थानकापुढे मोठा खड्डा नजरेस पडतो. या पुलाखालीही खड्डे आहे. पुढे कॉटनमार्केट चौक ते मोक्षधाम चौकादरम्यानच्या मार्गावर ठिकठिकाणी मोठेमोठे खड्डे आहेत. येथून मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाणारा मार्ग खाचखळग्यांचाच आहे. आयसोलेशन हॉस्पिटलपुढे मागील काही महिन्यांपासून खड्डा पडला आहे. बाजूलाच ओसीडब्ल्यु कंपनीने पाईपलाईन टाकण्यासाठी काही महिन्यांपूर्वी खोदकाम केले परंतु अद्याप दुरुस्ती केलेली नाही. याच मार्गावर पुढे रामबाग हाऊसिंग सोसायटीच्या प्रवेशद्वारापुढे मोठा खड्डा आहे. थोडे पुढे गेलो की मेडिकल चौकातही खड्डे आहेत. वंजारीगर पाणी टाकीजवळ मार्गाच्या मधोमध खड्डा आहे. वळणमार्गावर हा खड्डा असल्याने येथे अपघात होतात. तुकडोजी चौकातही दोन खड्डे आहेत. सक्करदरा तलावाच्या बाजूला असलेल्या बॉलिवूड सेंटर पॉर्इंट ते भांडे चौकादरम्यानचा मार्ग मागील काही महिन्यांपासून नादुरुस्त आहे. जागोजागी खड्डे आहेत. उमरेड मार्गावरील निर्मल नगरीसमोरच्या मार्गावर खड्डा आहे. याच मार्गावरील राजेंद्र हायस्कूल चौकात खड्डा आहे.
धोकादायक नरेंद्रनगर पूल
नरेंद्रनगर येथील रेल्वे पुशबॅक पुल हा बनल्यापासूनच चर्चेत आहे. या पुलाखाली पावसाचे पाणी साचणे ही आता नेहमीचीच बाब झाली आहे. या पुलाचे बांधकाम मुळातच सदोष आहे.
पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्थाच नसल्याने ऐन पुलातच पाणी साचते. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास होतो. येथील साचलेले पाणी काढण्यासाठी मोटार पंप हाऊस बनवण्यात आले आहे. मात्र ते बंद असताना पाणी साचून लोकांना त्रास होतो. परंतु मोठा धोका पुलाच्या मधोमध रस्त्यावर एक मोठा खड्डा पडला आहे. त्यातून सळाखी बाहेर आल्या आहेत. पाण्यात हा खड्डा दिसत नाही. हा खड्डा केवळ त्रासदायक नसून धोकादायक आहे. एखादा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरातील विवेक घवघवे यांच्या पत्नी किरण यांचा याच खड्ड्याने अपघात झाला. त्यांच्या पायाला जबर मार बसला.

Web Title: The digging of the potholes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.