डिजिटल फिजिटल करून रोजीरोटीचे प्रश्न सुटत नाहीत - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: December 22, 2016 07:54 IST2016-12-22T07:54:13+5:302016-12-22T07:54:13+5:30
फक्त डिजिटल फिजिटल करून लोकांच्या रोजीरोटीचे प्रश्न सुटत नाहीत असं सांगत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारच्या डिजीटल कॅम्पेनवरच टीका केली आहे

डिजिटल फिजिटल करून रोजीरोटीचे प्रश्न सुटत नाहीत - उद्धव ठाकरे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - पंतप्रधान मोदी यांनी ‘नोटाबंदी’ जाहीर करताच त्यांचे कौतुक करणार्यांत श्रीमान चंद्राबाबू आघाडीवर होते, पण महिनाभरातच त्यांच्या संयमाचा बांध तुटला व त्यांनी सांगितले की, ‘‘सगळाच गोंधळ दिसतोय.’’ शिवसेना हे सर्व आधीपासून परखडपणे सांगण्याचा प्रयत्न करीत होती. तेव्हा ‘सरकारमध्ये राहून सरकारी धोरणांविरुद्ध का बोलता?’ असे विचारणार्यांना चंद्राबाबू यांनी उशिरा का होईना, पण उत्तर दिले आहे. ‘नोटाबंदी’चा सगळ्यात मोठा वकील उलटला आहे. कारण शेवटी सत्य त्यांना समजले आहे असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलले आहेत.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे कालपर्यंत ‘नोटाबंदी’चे समर्थन बर्यापैकी करीत होते. मात्र आता त्यांनी याप्रश्नी मूग गिळून केलेली ‘तोंडबंदी’ झिडकारली आहे व नोटाबंदी सपशेल अपयशी ठरल्याचे जाहीर केले आहे. चंद्राबाबूंना उशिरा का होईना, पण सत्य समजल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे की इतका मोठा नेता भूलथापांना बळी पडून मृगजळामागे पळत राहिला याबद्दल आश्चर्य व्यक्त करावे? असा टोला उद्धव ठाकरेंनी मारला आहे.
मोदी यांच्याआधी आंध्र राज्य संपूर्ण ‘डिजिटल’ करण्याचे काम चंद्राबाबू यांनी करून दाखवले, पण त्या डिजिटल राज्याने चंद्राबाबूंचा दारुण पराभव करून त्यांना राजकीय वनवासातच पाठविले. कारण फक्त डिजिटल फिजिटल करून लोकांच्या रोजीरोटीचे प्रश्न सुटत नाहीत असं सांगत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारच्या डिजीटल कॅम्पेनवरच टीका केली आहे.