सुपुत्रांची वेगळी वाट रणजितबाबू पेचात

By Admin | Updated: May 31, 2014 01:03 IST2014-05-31T01:03:18+5:302014-05-31T01:03:18+5:30

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री रणजित देशमुख यांच्या सुपुत्रांनी वेगवेगळे राजकीय मार्ग धरल्यामुळे रणजितबाबूंसमोर पेच निर्माण झाला आहे. पित्याला सर्व मुले सारखीच असतात. कुण्या एकाची बाजू

A different way for the sons of the sons. Ranjeet Babu Pachat | सुपुत्रांची वेगळी वाट रणजितबाबू पेचात

सुपुत्रांची वेगळी वाट रणजितबाबू पेचात

एक काँग्रेसी तर दुसरे भाजपवासी : कोणता झेंडा घेऊ हाती ?
कमलेश वानखेडे - नागपूर
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री रणजित देशमुख यांच्या सुपुत्रांनी वेगवेगळे राजकीय मार्ग  धरल्यामुळे रणजितबाबूंसमोर पेच निर्माण झाला आहे. पित्याला सर्व मुले सारखीच असतात.  कुण्या एकाची बाजू उचलून धरण्यात अडचण होते. अशाच परिस्थितीला सध्या रणजितबाबूंना  सामोरे जावे लागत आहे. त्यांचे मोठे सुपुत्र आशीष यांनी पाच वर्षांंंपूर्वीच भाजपचा भगवा खांद्यावर  घेतला आहे तर लहान सुपुत्र डॉ. अमोल हे रणजितबाबूंच्या निष्ठावानांसोबत काँग्रेसला बळ  देण्याच्या कामी लागले आहेत. यामुळे रणजितबाबू यांचे सर्मथकही ‘कनफ्युज’ झाले आहेत.   ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ असा प्रश्न त्यांना पडला आहे.
    आशीष हे पुन्हा एकदा भाजपच्या तिकिटावर सावनेर किंवा पश्‍चिम नागपुरातून लढतील,  अशी शक्यता आहे. तर डॉ. अमोल हे काँग्रेसकडून रामटेकचा गड सर करण्याच्या तयारीत  आहेत. सावनेर व रामटेक या दोन्ही मतदारसंघाची सीमा एकमेकांना लागून आहे. आपली दोन  मुले, दोन वेगवेगळ्या पक्षाकडून आजूबाजूच्या मतदारसंघात रिंगणात उतरली, तर सावनेरात  आशीष यांच्या मंचावर जायचे की रामटेकात अमोल यांच्यासाठी फिरायचे, असा यक्षप्रश्न  रणजितबाबू यांच्यासमोर उभा राहणार आहे.
 आशीष देशमुख यांनी गेल्यावेळी सावनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर  निवडणूक लढविली होती. रणजितबाबू एकीकडे काँग्रेसींसाठी ‘दिलजोडो’ अभियान राबवितात  आणि दुसरीकडे त्यांचे पुत्र आशीष हे भाजपच्या उमेदवारीवर निवडणुकीत उतरतात ही दुटप्पी  भूमिका त्यावेळी मतदारांना पटली नाही. त्यामुळे आ. सुनील केदार यांच्या विरोधात स्थानिक  पातळीवर रोष असतानाही केदार यांनी देशमुखांना पछाडले होते.  सावनेरातील  पराभवानंतर  आशीष यांनी पुढील दोन-अडीच वर्षे मतदारांशी संपर्कच तोडला होता.  नंतर मात्र अडीच वर्षांंंंनी  ते पुन्हा एकाएकी सक्रिय झाले. दुरावलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला जवळ करू लागले. यावेळी  त्यांच्या हाती विदर्भाचा झेंडा होता. नागपूर अधिवेशन काळात देशमुखांनी विदर्भासाठी उपोषण  केले. ते उपोषण राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी लिंबूपाणी पाजून सोडविले आणि आशीष यांना  राजकीय बळ मिळाले. पुढील काळात त्यांनी विदर्भाचे आंदोलन अधिक तीव्र केले. आशीष हे  सध्या भाजपच्या प्रत्येक मोठय़ा कार्यक्रमात दिसतात. सावनेर विधानसभेत पुन्हा एकदा  भाजपकडून त्यांची उमेदवारी पक्की असल्याचा दावा त्यांचे सर्मथक करीत आहेत तर काहीजण  ऐनवेळी पश्‍चिममध्ये त्यांचे पुनर्वसन केले जाईल, असाही दावा करीत आहेत.
आशिष हे भाजपच्या जेवढय़ा जवळ गेले तेवढे रणजितबाबूंच्या राजकीय पाठबळापासून दुरावत  गेल्याचे दिसते. सध्या आशिष यांचे छोटे बंधू डॉ. अमोल देशमुख हे रणजितबाबूंच्या सहवासात  दिसतात. रणजितबाबूंनी आपल्या जुन्या व निष्ठावान लोकांशी डॉ. अमोल यांच्या भेटीगाठी करून  देण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत आशिष हे भाजप- शिवसेनेसाठी तर डॉ.  अमोल हे काँग्रेसचे उमेदवार मुकुल वासनिक यांच्यासाठी सक्रिय असल्याचे पहायला मिळाले.  रणजितबाबू यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम दरवर्षी नागपुरात व्हायचा. फार फार तर एखादवेळा  त्यांच्या गावाकडे झाला असेल. यावेळी मात्र चक्क रामटेकमध्ये वाढदिवस साजरा झाला. डॉ.  अमोल यांनी वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या जाहिराती प्रसिद्ध करीत या सोहळ्याला  नागरिकांनी येण्याचे आवाहनही केले. माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनीही कार्यक्रमाला  उपस्थिती लावली. हा सर्व घटनाक्रम पाहता डॉ. अमोल यांना रामटेकमध्ये काँग्रेसच्या  उमेदवारीसाठी प्रोजेक्ट केले जात आहे. यासाठी रणजितबाबूंचेही त्यांना भक्कम पाठबळ आहे.  त्यामुळे येत्या काळात रणजितबाबूंसमोर धर्मसंकट उभे राहील. त्यावेळी धृतराष्ट्राची नरोवा  कुंजरोवा भूमिका वठवायची की श्रीकृष्णासारखे दोघांनाही खूष ठेवायचे हे रणजितबाबूंनाच  ठरवावे लागेल.
 

Web Title: A different way for the sons of the sons. Ranjeet Babu Pachat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.