आपण यांना पाहिलत का? रेल्वेमंत्र्यांच्या शोधार्थ NCP कार्यकर्त्यांचा मोर्चा
By Admin | Updated: June 22, 2016 12:54 IST2016-06-22T12:42:40+5:302016-06-22T12:54:35+5:30
रेल्वे प्रवाशांना होणा-या मन:स्तापाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी सुरेश प्रभूंविरोधात घोषणा देत मोर्चा काढला.

आपण यांना पाहिलत का? रेल्वेमंत्र्यांच्या शोधार्थ NCP कार्यकर्त्यांचा मोर्चा
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - पावसाळ्यास सुरूवात होते न होते तोच मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकल सेवेचा खोळंबा झाला असून गेल्या दोन दिवसांत चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मंगळवारी पावसामुळे मध्य, पश्चिम व हार्बर रेल्वेची लोकलसेवा ठप्प झाली होती तर पारसिक बोगद्याजवळ दरड कोसळल्याने संध्याकाळपर्यंत वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. मात्र या सर्व घटना घडत असतानाच रेल्वे प्रशासन व इतर वेळेसस प्रवाशांच्या मदतीस तत्पर असलेले रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा कुठेच पत्ता नव्हता. याचा पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई महिला संघटनेच्या अध्यक्ष सुरेखा पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली सीएसटी येथे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पेडणेकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी 'आपण यांना पाहिलत का?' या मथळ्यासह सुरेश प्रभू यांची पोस्टर्स फडकावत प्रभू यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
रेल्वेच्या खोळंब्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असताना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू गेले कुठे? असा सवाल सुरेखा पेडणेकर यांनी केला. एरवी प्रवाशांच्या मदतीस तत्पर असलेल्या प्रभूंचा आता कुठेच पत्ता लागत नाही। कधी तांत्रिक बिघाडामुळे तर कधी पावसामुले रेल्वेसेवा खोळंबते, काल तर मुंब्र्याजवळ संरक्षक भिंत कोसळल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आणि बराच काळ ब्लॉक घेतल्यानंतरदरड बाजूला सारण्यात आली. या सर्व घटना व त्यामुळे होणारे नुकसान, धोका याची जाणीव रेल्वेमंत्र्यांना आधी का झाली नाही? त्यांनी दिलेली 'अच्छे दिन'ची घोषण म्हणजे निव्वळ पोकळ आश्वासन आहे का? रेल्वे प्रवाशांना अच्छे दिन कधी दिसणार असा सवाल पेडणेकर रेल्वेमंत्र्यांवर टीका केली.