मुंबईत १२ ठिकाणी डायलिसीस केंद्र उभारणार
By Admin | Updated: July 20, 2016 02:16 IST2016-07-20T02:16:40+5:302016-07-20T02:16:40+5:30
महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य खाते व मध्यवर्ती खरेदी खात्याद्वारे सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर १२ ठिकाणी डायलिसीस केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे.

मुंबईत १२ ठिकाणी डायलिसीस केंद्र उभारणार
मुंबई : महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य खाते व मध्यवर्ती खरेदी खात्याद्वारे सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर १२ ठिकाणी डायलिसीस केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे. या अंतर्गत संबंधित क्षेत्रातील अनुभव असणाऱ्या स्वयंसेवी संस्था, कंपन्या, व्यवसायिक आस्थापनांकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत. त्यानुसार, महापालिकेद्वारे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या १२ ठिकाणी १९९ डायलिसीस यंत्रे बसवण्यात येणार आहेत. या प्रत्येक यंत्राद्वारे दिवसाला साधारणपणे २ वेळा डायलिसीस करणे शक्य आहे. त्यामुळे दिवसाला ३९८ रुग्णांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे.
महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ठिकाणी डायलिसीस यंत्र बसविणे, त्यासाठी आवश्यक ते सर्व परिरक्षण (मेंटेनन्स) करणे, डायलिसीस करण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देणे या बाबींचे नियोजन व व्यवस्थापन करणे यशस्वी निविदाकारांना (कंत्राटदारांना) बंधनकारक असणार आहे. ही सुविधा दर महिन्याला साधारणपणे किमान २५ दिवस रुग्णांसाठी कार्यरत ठेवणे कंत्राटदारांना बंधनकारक असणार आहे. महापालिकेद्वारे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या १२ ठिकाणी १९९ डायलिसीस यंत्र बसविणे अपेक्षित असणार आहे. या प्रत्येक यंत्राद्वारे दिवसाला साधारणपणे २ वेळा डायलिसीस करणे शक्य असल्याने, १९९ यंत्रांद्वारे दिवसाला ३९८ रुग्णांना या सुविधेचा लाभ मिळेल. म्हणजेच, १९९ यंत्रांद्वारे महिन्याला साधारणपणे १० हजार वेळा डायलिसीस सुविधा देणे शक्य होणार आहे. (प्रतिनिधी)
>महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये डायलिसीस करण्यासाठी जेवढे शुल्क आकारले जाते, तेवढ्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क या केंद्रांमध्ये आकारण्यात येणार नाही. सध्या डायलिसीससाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ३५० रुपये आकारले जातात.
निविदाप्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे, पात्र असणारे जे निविदाकार रुग्णांकडून घेण्यात येणाऱ्या प्रस्तावित शुल्काबाबत सर्वात कमी रकमेची बोली लावतील, त्यांची या प्रक्रियेत यशस्वी निविदाकार म्हणून निवड होईल.
उदाहरणार्थ : ३५० रुपयांपेक्षाही कमी पैसे आकारून रुग्णांना डायलिसीस सुविधा देण्यासाठी तयार असणाऱ्यांपैकी जे निविदाकार तुलनेने सर्वात कमी रक्कम आकारतील, ते निविदा प्रक्रियेअंती ‘यशस्वी निविदाकार’ ठरतील. त्यामुळे रुग्णांना महापालिकेच्या निर्धारित शुल्कापेक्षाही कमी दरात डायलिसीस सुविधा मिळेल.
>बारा केंद्रांचा तपशील
आयसी कॉलनी, बोरीवली पश्चिम
मोहिली गाव, साकीनाका, अंधेरी पूर्व
मन्नन इमारत, आनंद नगर, दहिसर पूर्व
सेंट जॉन अलाईड सहकारी गृहनिर्माण संस्था, एच पश्चिम
वांद्रे गाव, वांद्रे पश्चिम
हरियाली गाव, पवई
ओशिवारा गाव, अंधेरी पश्चिम
एकसर गाव, बोरीवली पश्चिम
व्ही.एन.देसाई रुग्णालय
ज्योतिबा फुले रुग्णालय
माँ रुग्णालय
भाभा रुग्णालय (कुर्ला)