धुळ्यात विद्यार्र्थिनीची चित्रफित तयार केली
By Admin | Updated: November 17, 2014 03:50 IST2014-11-17T03:50:33+5:302014-11-17T03:50:33+5:30
चित्रफित काढून महाविद्यालयीन विद्यार्थिनीकडे दहा हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिच्या मित्रासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे

धुळ्यात विद्यार्र्थिनीची चित्रफित तयार केली
धुळे : चित्रफित काढून महाविद्यालयीन विद्यार्थिनीकडे दहा हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिच्या मित्रासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत़
धुळे तालुक्यातील निमगुळ येथील १७ वर्षीय विद्यार्थिनी महिला महाविद्यालयात बीसीएच्या प्रथम वर्षात शिकते. गावातीलच योगेश बाबुलाल ठाकरे या युवकाशी तिची मैत्री होती. तो शिक्षणासाठी धुळ्यात वास्तव्यास आहे. योगेशने शनिवारी या विद्यार्थिनीला गायत्रीनगरातील आपल्या रुमवर भेटण्यासाठी बोलविले होते. रुमबाहेर दोघे जण बोलत असताना त्या ठिकाणी सात जण आले. त्यांनी दोघांना एका रुममध्ये नेऊन दरवाजा बंद केला. त्या युवकाचे विद्यार्थिनीसोबत मोबाईलवर चित्रीकरण केले़ नंतर १० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास बदनामीची धमकी दिली.
तिने योगेशचा चुलतभाऊ यश याला ही हकीकत सांगितली. तेव्हा यशने पोलिसांकडे जाण्याचा सल्ला तिला दिला. तेव्हा विद्यार्थिनीने पोलीस निरीक्षक रमेश परदेशी यांना हकीकत सांगितली. त्याचवेळी विद्यार्थिनीला त्या युवकांचा मोबाईल आला आणि पैसे घेऊन दत्त मंदिर परिसरात येण्यास सांगितले. तेव्हा पोलिसांनी तेथे सापळा रचून पाचजणांना पकडले. पोलिसांना पाहून त्यापैकी दोन जण पसार झाले. नंतर विद्यार्थिनीचा मित्र योगेशलाही अटक करण्यात आली. सायंकाळी या सहाही युवकांची शहरातून धिंड काढण्यात आली. या सर्वांना २१ नोव्हेंबरपर्यत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.