धुळे - हल्लेखोरांचा ११ मजुरांवर प्राणघातक हल्ला

By Admin | Updated: September 20, 2016 17:09 IST2016-09-20T17:09:09+5:302016-09-20T17:09:09+5:30

धुळे तालुक्यातील बिलाडीरोडवरील प्रमोद गुलाबराव पाटील व अमित पाटील यांच्या शेतात काम करणाऱ्या आदिवासी मंजुरांच्या घरात दहा ते बारा अज्ञात गुन्हेगारांनी प्रवेश करून ११ मजुरांवर प्राणघातक हल्ला

Dhule - 11 attackers on strike | धुळे - हल्लेखोरांचा ११ मजुरांवर प्राणघातक हल्ला

धुळे - हल्लेखोरांचा ११ मजुरांवर प्राणघातक हल्ला

ऑनलाइन लोकमत

कापडणे, दि. २० : धुळे तालुक्यातील बिलाडीरोडवरील प्रमोद गुलाबराव पाटील व अमित पाटील यांच्या शेतात काम करणाऱ्या आदिवासी मंजुरांच्या घरात दहा ते बारा अज्ञात गुन्हेगारांनी प्रवेश करून ११ मजुरांवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे. यासंदर्भात सोनगीर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

लाथा, बुक्क्यांनी केली अमानुषपणे मारहाण
बिलाडीरोडवरील प्रमोद पाटील यांच्या मालकीच्या शेतातील झोपडीत सुबाराम मदन बारेला- पावरा (वय ५५) यांच्या कुटुंबातील सात सदस्य, तर अमित पाटील यांच्या शेतात रूमालसिंग वेस्तार पावरा (वय ३८) यांच्या कुटुंबातील चार असे एकूण ११ सदस्य राहतात.

रविवारी मध्यरात्री या झोपड्यांमध्ये दहा ते बारा हल्लेखोरांनी प्रवेश केला. त्यांनी या दोन्ही झोपड्यांमध्ये राहत असलेल्या मजुरांना दोरीने बांधून त्यांना लाथा, बुक्का व पावडी, विळा व काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
घर खाली करा, नाही तर मार खा!

हल्लेखोर रात्रीच्या सुमारास आले होते. त्यांनी चेहऱ्यावर काळा रूमाल बांधलेला होता. मात्र, सर्व हल्लेखोर हे आदिवासी पावरा भाषेत बोलत होते, अशी माहिती पीडितांनी दिली आहे. त्यांनी मजुरांना आठ दिवसाच्या आत ते राहत असलेली झोपडी खाली करण्याचे सांगितले आहे. ते न केल्यास पुन्हा येऊन जीवे ठार मारण्याची धमकी हल्लेखोरांनी मजुरांना दिली आहे. या धमकीमुळे भयभीत झालेले मजूर कापडणे गावात आश्रयासाठी आले आहेत.

मजुरांना लागला गंभीर मार
या हल्ल्यात मजुरांना गंभीर मार लागला आहे. हल्लेखोरांनी झोपडीत प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला मजुरांना दोरीने बांधल्यानंतर मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेत सुबाराम बारेला-पावरा यांचे दोन्ही पाय सुजलेले आहेत.
रूमालसिंग यांच्या पत्नी गिता पावरा हिच्या पायात चांदीचे कडे तोडण्यासाठी हल्लेखोरांनी चक्क कुऱ्हाडीने पाय कापण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने हल्लेखोरांकडे सोडून देण्याची याचना केली. त्यामुळे हल्लेखोरांनी ६०० रुपये व एक मोबाईल तिच्याकडून हिसकावून ते निघून गेले.

Web Title: Dhule - 11 attackers on strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.