ठाणे जिल्ह्यात धुवांधार

By Admin | Updated: August 1, 2016 03:22 IST2016-08-01T03:22:09+5:302016-08-01T03:22:09+5:30

शनिवार रात्रीपासून कोसळत असलेल्या धुवाधार पावसाने ठाणे जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला.

Dhowindhara in Thane district | ठाणे जिल्ह्यात धुवांधार

ठाणे जिल्ह्यात धुवांधार

टीम लोकमत,

ठाणे- शनिवार रात्रीपासून कोसळत असलेल्या धुवाधार पावसाने ठाणे जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला. दिवसभर सूर्यदर्शनही झाले नाही. या संततधारेमुळे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था पूर्णत: कोलमडून पडली. खड्डे आणि पावसामुळे रस्त्यावरील वाहतूकही ठिकठिकाणी तुंबली होती.
नालेसफाईचे दावे वारंवार केल्यानंतरही सखल भागांत पाण्याचा पुरेसा निचरा न झाल्याने अनेक घरांत पाणी शिरले. आषाढ अमावस्येच्या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
>वरूणराजा बरसला
रात्रभर कोसळत असलेल्या पावसाने रविवारी ठाणे शहराची पार दैना केली. सखल भागात नेहमीप्रमाणे पाणी तुंबले असले तरी चेना नदीच्या पाण्यामुळे आणि रस्त्यांंतील खड्ड्यामुळे घोडबंदर रसत बराचकाळ ठप्प होता, तर भिवंडीकडे जाणाऱ्या वाहतुकीलाही तुंबलेले पाणी आणि खड्ड्यांचा फटका बसला.
>तुफान फटकेबाजी
जिल्ह्यासह शहरातही रविवारी पावसाने दमदार हजेरी लावल्याने सखल भागांत पाणी साचले, तर मुंब्रा बायपासवर दरड कोसळली. दरम्यान, कासारवडली येथे सहलीसाठी आलेले १२ पर्यटक पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे अडकले होते. तसेच माजिवडा येथे एका शाळेत ६० विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते. शाळेत पावसाचे पाणी भरल्याचे समजताच ठाणे पालिकेचा आपत्कालीन विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांची सुरक्षित सुटका केली. सखल भागांत पाणी साचल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवरही झाला. 
संततधार पावसाने शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्र ारी येताच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आपत्कालीन कक्षात तळ ठोकून परिस्थितीचा आढावा घेत होते. त्यांनी तत्काळ विविध अधिकाऱ्यांची पथके तयार करून त्यांना प्रभाग समित्यांनुसार फिरण्याच्या सूचना दिल्या. तसेच कार्यकारी अभियंते आणि सहायक आयुक्तांनाही प्रभाग समित्यांमधून फिरून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यामुळे नागरिकांच्या तक्र ारी लगेच सुटल्या. महापौर संजय मोरे यांनीही आपत्कालीन कक्षात बसून परिस्थितीचा आढावा घेतला.
 

Web Title: Dhowindhara in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.