Dhananjay Munde News Marathi: आजारपणाचे कारण देत धनंजय मुंडे यांनी आज (४ मार्च) अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला होता. हा राजीनामा राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी मंजूर केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने काही दिवसांपूर्वी आरोपपत्र दाखल केले. संतोष देशमुख यांची कशा पद्धतीने हत्या करण्यात आली, याचे काही फोटो समोर आले. त्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उमटली. रात्रीतून राजकीय हालचाली झाल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे यांची बैठक झाली. सोमवारी (३ मार्च ) रात्री झालेल्या या बैठकीनंतर मंगळवारी सकाळी धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
राज्यपालांकडून राजीनामा मंजूर
राजभवनाने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल माहिती दिली. "राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मंजूर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीवरून राज्यपालांनी मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे", असे राजभवनकडून सांगण्यात आले.
राजीनाम्याच्या कारणामध्ये विसंगती
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला, पण त्यांच्या राजीनाम्याच्या कारणामध्ये विसंगती होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिल्याचे सांगितले. पण, धनंजय मुंडेंनी मात्र वेगळी भूमिका मांडली. आजारी असून विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे राजीनामा दिल्याचे मुंडे म्हणालेले आहेत.