लोकमत न्यूज नेटवर्क, पैठण (जि. छत्रपती संभाजीनगर) : परळीत गांजा, वाळू, राख, भंगार, देशी-विदेशी पिस्तूल विक्री आदी अवैध धंद्यांच्या माध्यमातून आका आणि त्याचे आका यांची पुणे येथे १०० कोटी रुपयांची मालमत्ता असून, ती इतरांच्या नावावर खरेदी केल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी गुरुवारी पैठण येथील आक्राेश माेर्चात बाेलताना मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्यावर केला. यावेळी व्यासपीठावर मनोज जरांगे पाटील, मयत संतोष देशमुख यांचा मुलगा, मुलगी, भाऊ, आदींची उपस्थिती होती.
छोट्या आकाच्या ड्रायव्हरच्या नावे पुणे येथील मगरपट्टा भागातील अमनोरा पार्क येथे ७५ कोटींचा फ्लॅट आहे. पुणे येथे वैशाली हॉटेलच्या पाठीमागे जंगली महाराज रोड येथे ७ शॉप बुक केले आहेत. एका शॉपची किंमत ५ कोटी आहे. यापैकी चार शॉप ज्योती जाधव यांच्या नावावर आहेत. तर आरोपी विष्णू चाटेची मावस बहीण सोनवणे हिच्या नावावर एक शॉप आहे, असा आरोप आ. धस यांनी केला.
मुंडेंनी धाक दाखवून जमीन हडपली : सारंगी महाजन
परळी येथील माझी जमीन धनंजय मुंडे व त्यांच्या माणसांनी धाक दाखवून हडपली, असा आरोप दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी केला. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी भेट घेतली. त्या म्हणाल्या, प्रवीण महाजन यांच्या नावे परळी तालुक्यात जिरेवाडी येथे असलेली जमीन धनंजय मुंडे यांनी त्यांच्या नोकराला म्हणजे गोविंद मुंडेला मध्ये घालून माझ्याकडून धाक दाखवून, धोक्याने रजिस्ट्री करून फसवणूक केली.
पाठीशी घालणार नाही
बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाची न्यायालयीन, एसआयटी, तसेच सीआयडी, अशा ३ स्तरांवर चौकशी सुरू आहे. कोणतेही पक्षीय राजकारण न आणता हा तपास होईल, दोषींना शासन होईल, कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
परळीत १०९ मृतदेह सापडले
२०२४ या वर्षात परळीत १०९ मृतदेह सापडले आहेत, त्यातील केवळ पाचची नोंद झाली आहे. १०४ मृतदेहांची ओळखही पटली नाही, असा दावा आ. धस यांनी केला.
दोन ‘आकां’चे अनेक ‘उद्योग’
- आ. धस म्हणाले, दोन ‘आकां’च्या जीवावर परळीत इराणी समाजाचे लोक देशी, गांजा, चरस, विदेशी, देशी रिव्हॉल्वर विकतात. त्याचा हिस्सा घेण्यासाठी विशेष पोलिसांची नियुक्तीही ‘आका’च करतात. या दोन ‘आकां’चे अनेक ‘उद्योग’ आहेत.
- मोठ्या आकाची (धनंजय मुंडे यांची) माजलगावमधील पारगाव नरवडे येथे ५० एकर, शेंद्री, ता. बार्शी येथे ज्योती जाधव यांच्या नावे ५० एकर, सिमरी पारगाव येथे मनीषा नरवडे यांच्या नावे १० एकर जमीन.
- माजलगावात वॉचमन योगेश काकडे यांच्या नावे १५ ते २० एकर, दिघोल येथे ज्योती जाधव यांच्या नावे १० ते १५ एकर जमीन अशी शेकडो एकर जमीन आहे.