बीड- हैद्राबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सोमवारी बीड जिल्ह्यात विराट मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलेल्या या मोर्चात हजारोंच्या संख्येने बंजारा बांधव सहभागी झाले. या मोर्चाला माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली व समाजाला पाठिंबा जाहीर केला.
मुंडेंच्या वक्तव्यावरून संताप
धनंजय मुंडे यांनी भाषणात 'बंजारा आणि वंजारा एकच आहेत' असे वक्तव्य केले. या विधानावरून समाज आक्रमक झाला. बंजारा बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत शब्द मागे घ्या, अशी मागणी केली. समाजाच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, वंजारा आणि बंजारा हे वेगळे समाज असून त्यांची भाषा आणि संस्कृती वेगळी आहे. यापूर्वीच 1994 मध्ये गोपीनाथ मुंडेंच्या विधानानंतर त्यांच्या ताटातील अडीच टक्के आरक्षण काढून घेतले गेले आहे. आता पुन्हा ‘वंजारा-बंजारा एकच’ अशी भूमिका घेतली जाणे समाजासाठी घातक आहे. 'परत तो खेळ आमच्यासोबत होऊ नये, वक्तव्य मागे घ्यावे', अशी मागणी समाजाने यावेळी केली.
धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?
धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, 'बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावे यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या मागणीबाबत सकारात्मकता दाखवली आहे. अभ्यासगट वा समिती नेमून सरकार आरक्षण देऊ शकते. हैद्राबाद गॅझेटनुसार अनेक समाज एसटीमध्ये आहेत, तेलंगणातसुद्धा आमच्या नोंदी आहेत. त्यामुळे बंजारा आणि वंजारा एकच आहेत. यानंतर मोर्चात काही वेळ संतापाची लाट उसळली. तरुणांनी धनंजय मुंडेंना आपले शब्द मागे घेण्याची मागणी केली.