Dhananjay Deshmukh News: बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. यातच या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने लावून धरली जात आहे. यामध्ये सुरेश धस, मनोज जरांगे पाटील, अंजली दमानिया आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपा आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर आता या प्रकरणात महाविकास आघाडीचे नेते पुन्हा सक्रिय झाले आहेत. यावरून आता सुरेश धस यांना लक्ष्य केले जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मृत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली. जोपर्यंत देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत. बीड जिल्ह्यातील गुंडा गर्दी संपली पाहिजे, बीडमधील सत्ता आणि पैशाची मस्ती उतरली पाहिजे. गावकऱ्यांनो, सामूहिक अन्नत्याग आंदोलन करू नका, असे आवाहन सुळे यांनी केले. या प्रकरणातील सर्व गुन्हेगार व पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक या सर्वांचे सरपंच हत्येपूर्वीपासूनचे व अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्यादरम्यानचे सीडीआर काढून दोषी अधिकारी शोधले पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या. यानंतर आता धनंजय देशमुख यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.
कुणीही सुटता कामा नये, आमच्या अपेक्षा सुरेश धस पूर्ण करतील
मीडियाशी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, या प्रकरणातून कोणीही सुटता कामा नये, हीच सुरेश धस यांची अपेक्षा आहे. ते त्या अपेक्षांना पूर्ण करतील. अण्णाकडून सगळ्या गावाला, कुटुंबियांना पहिल्या दिवसापासून अपेक्षा आहे. सुरेश अण्णा यांनी मुख्यमंत्री आणि देशमुख कुटुंबियातील दुवा म्हणून काम केले. एसआयटी नेमायची असेल, सीआयडीमधील अधिकारी नेमायचे असतील. तर या प्रकरणातील ज्या गोष्टी आहेत, त्या आम्ही अण्णांकडे सांगायचो, त्यावर अण्णा आम्हाला सांगायचे. यातून कोणी सुटले कामा नये. हीच अपेक्षा अण्णांची आहे आणि ते अपेक्षांना पूर्ण करतील. मनोज जरांगे पाटील तीच अपेक्षा आहे. तुम्ही जबाबदारी घेतली ती शेवटपर्यंत निभवावी अशी आमची भावना आहे, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आमच्या शिष्टमंडळातील काही लोक आहेत ते अण्णाला बोलले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, आमच्याकडून एकही चुकीचे काम होणार नाही. माझ्याकडून एकही गोष्ट अशी होणार नाही की हे आरोपी सुटतील, जे करता येईल ते तुम्ही मला सांगा मी करणार, असे धस म्हणाले.