विदर्भावर देवेंद्र प्रसन्न
By Admin | Updated: December 20, 2014 02:46 IST2014-12-20T02:46:00+5:302014-12-20T02:46:00+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विदर्भाचे मागासलेपण दूर करण्यासाठी अनेक योजनांची घोषणा विधानसभेत केली.

विदर्भावर देवेंद्र प्रसन्न
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विदर्भाचे मागासलेपण दूर करण्यासाठी अनेक योजनांची घोषणा विधानसभेत केली. या योजना निश्चित वेळेत पूर्ण करण्याचा निर्धार करताना महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्प २०१७ मध्ये पूर्ण करू, विदर्भातील १०२ सिंचन प्रकल्प येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येतील, असे त्यांनी जाहीर केले. रस्ते, सिंचन, विपणन, हवाई वाहतूक, पर्यटन, उद्योग यावर फोकस असलेल्या योजना त्यांनी जाहीर केल्या.
विदर्भात आतापर्यंत नागपूरपुरते मर्यादित असलेले हवाईविश्व फडणवीस यांनी अमरावती, अकोल्यासाठी खुले करण्याची घोषणा केली.
दिलीप वळसे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, विजय वडेट्टीवार या ज्येष्ठ सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावावर दोन दिवसांच्या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत उत्तर दिले. आघाडी सरकारने दहा वर्षांत न घेतलेले निर्णय आम्ही दहा दिवसांत घेतले. आमच्याकडे आघाडीसारखी ओढाताण होत नाही. विदर्भाच्या विकासाची तळमळ गेल्या १५ वर्षांत दिसली नाही आता ती कृतीतून दिसेल, असा चिमटाही त्यांनी काढला.
अमरावती विमानतळाचा तीन वर्षांत विस्तार अमरावतीचे (बेलोरा) विमानतळ वर्षभर सारख्याच क्षमतेने चालेल अशी व्यवस्था निर्माण केली जाईल. तेथे रात्रीच्या लँडिंगची सोय केली जाईल. तसेच, तेथील धावपट्टी २३०० बाय ६० मीटर इतकी वाढविली जाईल. या बाबत विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा झाली असून तीन वर्षांत विस्ताराचे काम पूर्ण केले जाईल. त्यानंतर तेथे बोर्इंग, एअरबस ३२० सारखी जम्बो विमाने उतरू लागतील आणि विकासाचा नवा अध्याय सुरू होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. अकोला आणि शिर्डी विमानतळाचा विकास करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
(विशेष प्रतिनिधी)