Devendra Fadnavis on CM Post | मंत्री कोण, मुख्यमंत्री कोण? हे प्रश्न गौण - देवेंद्र फडणवीस
मंत्री कोण, मुख्यमंत्री कोण? हे प्रश्न गौण - देवेंद्र फडणवीस

मुंबई  - शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदावरून मतभेद होणार अशी चर्चा सुरू असतानाच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्रिपदाबाबत मोठी भूमिका मांडली. ''महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याच्या चर्चा सध्या माध्यमांमध्ये रंगल्या आहेत. मात्र मंत्री कोण? मुख्यमंत्री कोण हा प्रश्न गौण आहे. त्यामुळे याबाबत फार चर्चा न करता प्रचंड बहुमताने युतीचे सरकार आणूया. पुढे काय करायचे हे आधीच निश्चित झाले आहे.''असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन सोहळा आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात संपन्न झाला. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे उपस्थित होते. शिवसेनेच्या मेळाव्याला जाताना दुसरीकडे जातो असे वाटत नाही. मला आलेल्या या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून सध्या चर्चा सुरू आहेत. मात्र मी येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि माझे मोठे भाऊ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रेम घेण्यासाठी आलो आहे. असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 


यावेळी प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदावर मोठे भाष्य केले. ''मुख्यमंत्रिपदावरून प्रसामाध्यमांमध्ये चर्चा रंगली आहे. मात्र प्रसारमाध्यमांना रोज बातम्या द्यायच्या असतात. सध्या आपल्यासाठी मंत्री कोण? मुख्यमंत्री कोण हा प्रश्न गौण आहे. त्यामुळे याबाबत फार चर्चा न करता प्रचंड बहुमताने युतीचे सरकार आणूया. पुढे काय करायचे आहे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आम्ही मिळून निश्चित केले आहे. ते तुमच्यासमोर येईलच.'' असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

तसेच राज्यात शिवसेना आणि भाजपा ही वाघ व सिंहाची जोडी एकत्र आली आहे, त्यामुळे विरोधकांचा पराभव निश्चित आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत यापूर्वी मिळाला नसेल असाच विजय आपल्याला विजय मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


Web Title: Devendra Fadnavis on CM Post
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.