मुंबई विद्यापीठाला विकास ‘लकवा’
By Admin | Updated: April 13, 2015 05:36 IST2015-04-13T05:36:58+5:302015-04-13T05:36:58+5:30
मुंबई विद्यापीठाच्या गत अर्थसंकल्पामध्ये केलेल्या घोषणा अद्यापही कागदावरच आहेत. विविध योजनांसाठी जाहीर केलेला निधी वापरात आला

मुंबई विद्यापीठाला विकास ‘लकवा’
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या गत अर्थसंकल्पामध्ये केलेल्या घोषणा अद्यापही कागदावरच आहेत. विविध योजनांसाठी जाहीर केलेला निधी वापरात आला नसल्याने विद्यापीठाला विकास लकवा झाला आहे की काय, अशी टीका विद्यापीठ वर्तुळात व्यक्त होत आहे.
विद्यापीठाने २0१३-१४ या अर्थसंकल्पात विविध योजनांसाठी कित्येक कोटींची तरतूद केली होती. मात्र, तरतूद केलेला निधीतील एक रुपयाही आजवर वापरण्यात आला नसल्याने विद्यापीठाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठाणे उपकेंद्रासाठी ४ कोटींची तरतूद झाली. मात्र, त्यामधील निधी पूर्ण वापरलेला नाही. विद्यानगरीतील विविध बांधकामांसाठी २८ कोटी ४५ लाखांची तरतूद करण्यात आली होती. त्यामधील १0 कोटींचा खर्च झाला आहे. तसेच विद्यापीठाच्या प्रेसमधील मशनरीसाठी २0 लाखांची मात्र त्यामधील एकही रुपया खर्च झाला नसल्याने विद्यापीठ प्रशासनाचा कारभार कुर्मगतीने सुरु असल्याचे दिसत आहे.
कलिना कॅम्पसमध्ये उभारण्यात येत असलेल्या सुरक्षा भिंतीचे कामही ठप्प झाले आहे. प्रशासनाने कंत्राटदाराचे बिल न दिल्याने त्याने सुरक्षा भिंतीचे काम थांबवले आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या या दिरंगाईचा फटका विद्यापीठाच्या विकासाला बसत आहे. विद्यापीठ अर्थसंकल्पात तरतूद करते. परंतु तो निधी वापरात येत नसल्याने विद्यापीठाचे नुकसान होत असल्याचे, सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)