गडकिल्ल्यांसोबत जिजाऊसृष्टीचा विकास
By Admin | Updated: January 12, 2015 23:30 IST2015-01-12T23:30:34+5:302015-01-12T23:30:34+5:30
मुख्यमंत्र्यांची ग्वाही; मंत्रालय स्तरावर लवकरच बैठक.

गडकिल्ल्यांसोबत जिजाऊसृष्टीचा विकास
राजेश शेगोकार/बुलडाणा
छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण करून आदर्श राज्य पद्धतीचे उदाहरण घालून दिले. त्यांच्या आदर्शाचे प्रतीक असलेले गडकिल्ले हे सुरक्षित असावेत, त्यांचे संवर्धन व्हावे, म्हणून लवकरच पुरातत्व विभागासोबत बैठक घेऊन निश्चित असे धोरण ठरवू; तसेच जिजाऊसृष्टीच्या विकासासाठी तयार करण्यात आलेला आराखडा पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सव सोहळय़ामध्ये दिली.
जिजाऊसृष्टीवर जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री एकनाथ खडसे, गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, युवराज संभाजीराजे भोसले, खा. सुप्रिया सुळे, खा. प्रतापराव जाधव यावेळी प्रामु ख्याने उपस्थित होते.
जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेडराजा हे देशाचे प्रेरणास्थळ आहे. येथे जिजाऊसृष्टी उभारली जात असून, यासाठी शासनस्तरावर पुरूषोत्तम खेडेकर यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊन निधी उपलब्ध करून दिला जाईल. जिल्हा विकास समितीमध्ये या क्षेत्राच्या विकासासाठी २५0 कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तो आराखडा पूर्ण करण्याची जबाबदारी पालकमंत्री या नात्याने एकनाथ खडसे यांच्याकडे राहणार आहे. या क्षेत्राचा विकास व्हावा व येणार्या काळात येथे भव्य स्मारक उभे रहावे, हा शासनाचा प्रयत्न असेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
युवराज संभाजी राजे यांनी उपस्थित केलेल्या गडकिल्ल्यांच्या प्रश्नावर सकारात्मक भूमिका दाखवत मुख्यमंत्री म्हणाले की, पुरातत्व विभागासोबत बैठक घेऊन किल्ल्यांच्या संरक्षणाचे धोरण ठरविले जाईल. केंद्राची परवानगी व राज्य सरकारचा निधी यांच्या समन्वयातून हे किल्ले संरक्षित केले जातील, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी न्यायालयीन लढाईत हे आरक्षण टिकेल, हा सरकारचा प्रयत्न राहील, असे स्पष्ट केले. आरक्षणावर स्थगिती आल्यामुळे रिक्त पदांची भरती करताना सरकारने जाणीवपूर्वक १६ टक्के जागा रिक्त ठेवल्या आहेत. आरक्षणाची स्थगिती उठताक्षणीच त्या जागा भरल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. आगामी काळात एक पर्यटन केंद्र म्हणून बुलडाणा जिल्ह्याचा विकास करू, असे महसूलमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ खडसे म्हणाले.
*राजकीय टोलेबाजी रंगली
खा.प्रतापराव जाधव यांनी त्यांच्या भाषणात मुख्यमंत्र्यांच्या आगमनाबाबत समाधान व्यक्त करून, मराठा मुख्यमंत्र्यांनी जिजाऊसृष्टीवर टाळले; मात्र गैरमराठा मुख्यमंत्री येथे आलेत, अशा शब्दात फडणवीस यांचे कौतुक केले. तोच धागा पकडत खा. सुप्रिया सुळे यांनी खासदार जाधवांच्या भाषणावर आक्षेप घेतला. कार्यक्रमात राजकारण आणण्याचा उद्देश नाही; मात्र यापूर्वीचे मुख्यमंत्री कार्यक्रमाला आले नसले, तरी त्यांनी जिजाऊसृष्टीच्या विकासासाठी नक्कीच पुढाकार घेतला, अशी आठवण करून दिली. या भाषणानं तर एकनाथ खडसे यांनी युती सरकारच्या काळातच जिजाऊसृष्टीकडे लक्ष देण्यात आले. इतरांनी मात्र पाठ फिरविली, असा टोला हाणला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी जे मुख्यमंत्री या ठिकाणी आले नाहीत ते दुर्दैवी होते. मी सुदैवी आहे, अशा शब्दात या टोलेबाजीचा समारोप केला. जिजाऊंचे दर्शन घेऊन प्रचाराची सुरूवात केली म्हणून मी मुख्यमंत्री झालो. त्यामुळे मी जिजाऊंचा चरणसेवक म्हणून काम करेन, असेही त्यांनी सांगितले.
*जिजाऊसृष्टीसाठी केंद्राकडून मदत - गडकरी
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. त्यांना घडविणार्या मातेचे जन्मस्थान विकसित व्हावे, येणार्या पिढीला हा इतिहास समजावा, यासाठी येथे उभारण्यात येणार्या जिजाऊसृष्टीकरिता केंद्राकडूनही निश्चित मदत दिली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
*जिजाऊसृष्टीसाठी एक कोटीचा निधी
जिजाऊसृष्टीच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या २५0 कोटीच्या आराखड्यातील १ कोटी रु पयांचा निधी तत्काळ उपलब्ध करून देत असल्याची घोषणा पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी केली.