मुंबई : कॉर्पोरेट, शासन आणि नागरिक एकत्र आल्यास देशाचा विकास शक्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सोमवारी पार पडलेल्या ‘द सीएसआर एक्सलेंस पुरस्कार’ वितरण सोहळ्यावेळी ते बोलत होते.मुख्यमंत्री म्हणाले की, कॉर्पोरेट्सने राज्यातील शाळा व महाविद्यालय उभारणीपासून रोजगारनिर्मिती व पर्यावरण संवर्धनात वाटा उचलण्याची गरज आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून समाजातून मिळणाºया नफ्याच्या बदल्यात समाजाला मोबदला द्यायलाच हवा. त्यातूनच कॉर्पोरेट्सची सामाजिक बांधिलकी दिसते. गतवर्षी राज्यात सीएसआरच्या माध्यमातून एक हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च झाली. राज्याच्या विकासासाठी शासन अर्थसंकल्पात ठरावीक निधीची तरतूद करतच असते. मात्र ज्या ठिकाणी शासकीय यंत्रणा अपुरी पडेल, तिथे कॉर्पोरेट्सने स्वत:ची यंत्रणा आणि साधने वापरण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले. सध्या राज्यातील १ हजार गावांमध्ये परिवर्तन आणण्याचा प्रकल्प सुरू आहे. त्यात कॉर्पोरेट्स व तरुणांची मोठ्या प्रमाणात मदत होत आहे. लवकरच या गावांतील बदल देशासमोर मांडण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली.दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीएसआर फंडातून सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाºया कॉर्पोरेट्सला गौरवण्यात आले. त्यात शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण, शेती आणि ग्रामीण विकास, आरोग्य आणि स्वच्छता, महिला सक्षमीकरण व बाल कल्याण, पर्यावरण, पशुकल्याण, क्रीडा या सात क्षेत्रांत मोलाची कामगिरी बजावणाºया प्रकल्पांना पुरस्कृत करण्यात आले. विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा समावेश असलेल्या ज्युरीने या पुरस्कारांची निवड केली.या ज्युरींमध्ये आयआयसीएचे माजी महासंचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी भास्कर चॅटर्जी, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, गुंजचे संस्थापक अंशु गुप्ता, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या विशेष कार्याधिकारी (ओएसडी) दुर्गा शक्ती नागपाल, जेएसएल फाउंडेशनचे संस्थापक सृष्टी जिंदाल, मुंबईच्या आयकर विभागाचे मुख्य आयुक्त अनिल कुमार, जागतिक बँकेच्या कार्यक्रमांचे लेखा परीक्षक निरंजन जोशी, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्षा इंद्रा मालो, ‘इंडिया टुडे मॅगझिन’चे उपसंपादक उदय माहुरकर, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांचा समावेश होता. या वेळी सर्व ज्युरी सदस्यांसह मुख्यमंत्र्यांना पुरस्कार सोहळ्याचे आयोजक ज्येष्ठ पत्रकार अमित उपाध्याय यांनी पोट्रेट देऊन गौरविले.पुरस्कार विजेत्यांची नावे-या सोहळ्यात भारती फाउंडेशनच्या सत्य भारती स्कूल प्रोग्रॅम प्रकल्पाला शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण विभागातील, तर रिलायन्स पॉवर लिमिटेडच्या उन्नती प्रकल्पाला कृषी आणि ग्रामीण विकास क्षेत्रातील कामगिरीसाठी गौरवण्यात आले. मॅग्मा फिनकॉर्प लिमिटेडच्या एम-केअर मोबाइल क्लिनिकला आरोग्य आणि स्वच्छता क्षेत्रातील कामगिरीसाठी, तर डीसीबी बँकेच्या सौरऊर्जा प्रकल्पाला पर्यावरण क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महिला सक्षमीकरण आणि बाल कल्याणाचे काम करणाºया सोसिएट जनरेलच्या रग्बी इन इंडिया या प्रकल्पाने पुरस्कारावर आपले नाव कोरले. तसेच नव्याने सामील करण्यात आलेल्या क्रीडा प्रकारात गो स्पोटर््स फाउंडेशनच्या पॅरा चॅम्पियन्स प्रोग्रॅम आणि पशुकल्याण प्रकारात अॅनिमल राहतच्या कम्युनिटी लेड अॅनिमल बर्थ कंट्रोल अॅण्ड अँटी रेबिज (एबीसी अॅण्ड एआर) प्रोग्रॅमला पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्यात आले.
कॉर्पोरेट्स व शासनाच्या भागीदारीतून देशाचा विकास शक्य! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 03:37 IST