व्यक्तिमत्त्व विकासातून सामाजिक विकास व्हावा
By Admin | Updated: July 31, 2016 02:31 IST2016-07-31T02:31:15+5:302016-07-31T02:31:15+5:30
आजच्या तरुण पिढीचे विचार आक्रमक होत आहेत. त्यासाठी विवेक वाहिनी या प्रकल्पाची मांडणी करण्यात आली आहे.

व्यक्तिमत्त्व विकासातून सामाजिक विकास व्हावा
तळा : आजच्या तरुण पिढीचे विचार आक्रमक होत आहेत. त्यासाठी विवेक वाहिनी या प्रकल्पाची मांडणी करण्यात आली आहे. विवेक या शब्दात मोठे सामर्थ्य आहे. समाज एका वेगळ्या दिशेने भरकटत असून, गुन्हेगारी प्रवृत्ती यांना रोखण्याचे मोठे आव्हान सर्वांपुढे आहे. तरुणांनी आपल्या व्यक्तिमत्त्व विकासातून सामाजिक विकास साधावा. त्यासाठी विवेक वाहिनी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय, तळा यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन तळा वि. शि. प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. विद्याधर धामणकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक राज्य सरचिटणीस नितीनकुमार राऊत, राज्य सरचिटणीस आरती नाईक व रायगड जिल्हा अध्यक्ष मोहन भोईर उपस्थित होते.
कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. भगवान लोखंडे यांनी करताना राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम कशा प्रकारे सुरू आहे, श्रध्दा आणि अंधश्रध्दा यामधील फरक विशद करून आपले थोडक्यात प्रास्ताविक केले, तर उद्घाटन आणि संस्थेचे अध्यक्ष अॅड. विद्याधर धामणकर यांनी आजही ग्रामीण विभागातून बुवाबाजी चालू आहे. आपण त्यावर विश्वास ठेवत आहोत. आजच्या तरुणांनी समाजासमोर श्रध्दा आणि अंधश्रध्दा यातील फरक पटवून अंधश्रध्देपासून समाजाला दूर केले पाहिजे. पाण्यावर दिवा पेटवून मी उद्घाटन केले. खरोखरच पाण्यावर दिवा पेटेल का? पण हे करताना यामागे शास्त्रीय कारण आहे. ते पुढील सत्रात विशद केले जाईल. अशासारख्या भूल थापांना, बुवाबाजीला समाजाने बळी पडता कामा नये आणि ही जबाबदारी तुम्हा तरुणांवर येते, असे मनोगत व्यक्त केले.
डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, कलबुर्गी या तीन व्यक्तींच्या हत्या झाल्या. हत्येकरी शोधून काढण्यासाठी सनदशीर मार्गाने लढा सुरू ठेवला आहे. त्यांची हत्या म्हणजे त्यांच्या विचारांची हत्या असून कोणताही वाईट मार्ग न स्वीकारता न्याय मागत असल्याचे त्यांनी सांगितले.
>सामजिक प्रबोधन महत्त्वाचे
दाभोलकरांनी अंधश्रध्दा निर्मूलनाचे कार्य राज्यात सुरू केले. त्यांचे पुढील काम आपण अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या माध्यमातून करीत आहोत.
समाजात आजही अंधश्रध्दा मोठ्या प्रमाणात आहे. ती नष्ट करण्यासाठी तरुणवर्ग पुढे आला पाहिजे, त्यासाठी सामाजिक प्रबोधान महत्त्वाचे असल्याचे विचार डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केले.