लोकहितासाठी देवस्थानांनी समोर यावे - सुप्रिया सुळे
By Admin | Updated: September 20, 2015 22:55 IST2015-09-20T22:55:00+5:302015-09-20T22:55:00+5:30
शेगाव येथील देवस्थान न्यासांची सामाजिक जबाबदारी’ या विषयावरील चर्चासत्रात सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य.

लोकहितासाठी देवस्थानांनी समोर यावे - सुप्रिया सुळे
फहीम देशमुख / शेगाव (जि. बुलडाणा) : राज्यातील देवस्थानांनी शेगावच्या संत गजानन महाराज संस्थानप्रमाणे लोकहितासाठी समोर यावे असे आवाहन खा. सुप्रिया सुळे यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त रविवारी येथे देवस्थान न्यासांची सामाजिक जबाबदारी या विषयावर आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या. येथील श्री. संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या स्वाध्याय कक्ष, सर्मथ रामदास स्वामी क्रीडा मंदिरात आयोजीत या चर्चासत्राचे उदघाटन संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सिद्धीविनायक संस्थानचे नरेंद्र राणे, जैन देवस्थानचे सुदर्शन जैन, पीर मगदूम साहेब चॅरिटेबल ट्रस्टचे नूर पारकर, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, अँड. स्मित सरोदे, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आदींची उपस्थिती होती. खा. सुप्रीया सुळे पुढे म्हणाल्या की, भविष्यातही प्रतिष्ठानच्यावतीने जागर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. मध्यंतरीच्या काळात महिलांसाठीच्या चळवळी कमी पडल्या. मात्र, आता याकडे पुन्हा लक्ष केंद्रित केले जाईल. शेगाव संस्थानचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार त्यांनी काढले. या चर्चासत्रासाठी बीज निबंधाचे सादरीकरण अर्थतज्ज्ञ डॉ. अभय टिळक यांनी केले. उदघाटनपर भाषणात कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या चर्चासत्राची खर्या अर्थाने आज गरज असल्याचे सांगितले. अँड. स्मित सरोदे, नूर पारकर, फादर फ्रान्सिस दिब्रिटो आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक सदा डुंबरे तर संचालन सुधीर भोंगळ यांनी केले. यावेळी श्री. संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या प्रा. झा यांनी संस्थानच्या कार्याचा आढावा घेतला. चर्चासत्रात माजी जि.प. उपाध्यक्ष पांडूरंग पाटील, ज्ञानेश्वर पाटील, संगीतराव भोंगळ, अँड. नाझेर काझी, बुलडाणा न. प. अध्यक्ष टी.डी.अंभोरे, निलेश राऊत, चेतन पुंडकर, अमीत जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
*ही शिस्त पक्षात असती तर ..
खा. सुप्रिया सुळे चर्चासत्रात सहभाग घेण्यासाठी पोहचल्या. यावेळी सभागृहासमोर अत्यंत व्यवस्थितपणे काढलेले चपला, बुटांचे जोड पाहून त्या मनातल्या मनात हसल्या. त्यानंतर मंचावरुन भाषण देतांना त्यांनी हसण्याचे रहस्य उघड केले. येथील शिस्त आदर्शवत आहे. अशा शिस्तीतूनच विकासाकडे वाटचाल होते. हीच शिस्त जर पक्षात असती तर आज वेगळे दिवस असते असा मार्मिक टोला त्यांनी यावेळी आपल्या कार्यकर्त्यांना लगावला.