उजाड माळरानाला आले देवपण...
By Admin | Updated: July 11, 2016 05:48 IST2016-07-11T05:48:10+5:302016-07-11T05:48:10+5:30
उजाड माळरानावर नाचणाऱ्या भगव्या पताका, त्यामधून वाऱ्याच्या वेगाने दौडणारे दोन अश्व, हे पाहून सुखावलेले अवघे वैष्णवजन अश्वांपुढे नतमस्तक झाले

उजाड माळरानाला आले देवपण...
बाळासाहेब बोचरे, पुरंदावडे (जि. सोलापूर)
उजाड माळरानावर नाचणाऱ्या भगव्या पताका, त्यामधून वाऱ्याच्या वेगाने दौडणारे दोन अश्व, हे
पाहून सुखावलेले अवघे वैष्णवजन अश्वांपुढे नतमस्तक झाले
अन् एरव्ही ओसाड असलेल्या माळरानाला देवपण मिळाले.
गेली कित्येक वर्षे सदाशिवनगर येथील शंकर साखर कारखान्याच्या मैदानावर
पहिले गोल रिंगण होत असे, पण तिथे जागा अपुरी पडल्याने यंदा प्रथमच पुरंदावडे येथे रिंगण घेण्याचा निर्णय झाला. शासनाने यासाठी १५ एकर जागा दिली आहे. पुरंदावडे ग्रामपंचायतीने याठिकाणी स्वच्छता केली होती. विस्तीर्ण अशा
परिसरात रिंगण आखण्यात आले. पोलिसांनी येईल त्या भाविकांना व्यवस्थित बसविले होते. दुपारी
दीड वाजता माऊलींची पालखी
डावीकडून प्रदक्षिणात मध्यभागी झाली. त्यापाठोपाठ आलेल्या पताकाधारींनी दाटी केली म्हणून लांबून माऊलींचे विश्वरुप दर्शन होत होते.
दिंड्यादिंड्यांमधून अखंड टाळ-मृदंगाचा जयघोष चालू होता, तर पताका पालखीभोवती नाचत होत्या. रिंगणावर राजश्री जुन्नरकर, राजेंद्र जुन्नरकर व समर्थ रंगावलीच्या कलाकारांनी रांगोळ्या काढल्या होत्या. सुमारे १ किमी परिघाची धावपट्टीवर धावण्यास दोन्ही अश्व सज्ज होते. रिंगणाची तयारी
पूर्ण होताच भोपळे दिंडीच्या पताका घाटीची फेरी पूर्ण होताच प्रथम अश्वाला धावपट्टी दाखविण्यात आली. चोपदारांनी अश्वाला सोडून देताच दोन्ही अश्वांचा पाठशिवणीचा खेळ सुरू झाला. टाळ-मृदंगाचा गजर आणि माऊली-माऊलीच्या घोषाने आसमंत दणाणून गेला.
रिंगण पाहून अवघ्या वैष्णवजनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. अवघा वैष्णवमेळा माऊलींच्या चरणी लीन झाला. अश्वांच्या टापाखालची माती उचलून कपाळी लावली जात
होती तर काही जण त्यावर लोटांगण घालत होते.
रिंगणाच्या खेळानंतर चोपदारांनी सर्व दिंडीकऱ्यांना उडीच्या खेळाला निमंत्रण दिले. विस्तीर्ण परिसर असल्याने बहुतांश दिंड्यांनी या खेळात भाग घेतला आणि तुकाराम-तुकाराम या
टिपेला पोहोचलेल्या तालावर
खेळ संपवून नाचत नाचतच रात्री माळशिरस गाठले. एरव्ही ओसाड असलेल्या माळरानाला देवपण मिळाले.