पोलीस दलातील बंडखोरांचा शोध सुरू
By Admin | Updated: January 3, 2015 02:47 IST2015-01-03T02:47:51+5:302015-01-03T02:47:51+5:30
नववर्षाच्या पहिल्या ठोक्याला बिनतारी संदेश यंत्रणा बंद करण्याबाबत पोलिस दलात शिजलेल्या कटाचा भांडाफोड ‘लोकमत’ने करताच एकच खळबळ उडाली.

पोलीस दलातील बंडखोरांचा शोध सुरू
औरंगाबाद/मुंबई : नववर्षाच्या पहिल्या ठोक्याला बिनतारी संदेश यंत्रणा बंद करण्याबाबत पोलिस दलात शिजलेल्या कटाचा भांडाफोड ‘लोकमत’ने करताच एकच खळबळ उडाली. या बंडात कोण कोण सहभागी होणार होते, याचा शोध गृहमंत्रालयाने सुरू केला असून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाईही होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.
आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पोलीस दलाच्या वायरलेस विभागातील काही कर्मचाऱ्यांनी एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मार्गदर्शनाखाली बंड पुकारण्याचा कट आखला होता. नववर्षाच्या पहिल्या ठोक्याला ते वायरलेस यंत्रणा ठप्प करणार होते. मात्र, याची कुणकूण वरिष्ठ अधिकाऱ्यांना लागताच त्यांनी तात्काळ पर्यायी व्यवस्था उभारल्याने ‘तो’ कट उधळला गेला. दरम्यान, पोलिस शिपायांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर हे ‘पोलीस कर्मचारी संघटन’ नावाची संघटना स्थापन करत असून या संघटनेच्या नोंदणीसाठी त्यांनी धर्मदाय आयुक्तांच्या कार्यालयात अर्ज केला आहे. याच संघटनेच्या माध्यमातून ३१ डिसेंबरच्या रात्री बिनतारी संदेश वहन यंत्रणा बंद पाडून आंदोलन करण्यात येणार होते, असा दावा तिरोडकर यांनी केला आहे.
‘लोकमत’शी बोलताना तिरोडकर म्हणाले, पोलिस दलाची शिस्त न मोडता आयपीएस असोसिएशनच्या धरतीवर ही संघटना काम करणार आहे. मुंबई, औरंगाबाद आणि नाशिकमधून संघटनेला मोठा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत सुमारे दीडशे अधिकारी-कर्मचारी सोबत आले आहेत. संघटनेच्या माध्यमातून संप करता येणार नाही, पण निषेध नोंदविण्यासाठी जी कृती शक्य असेल ती करणार, असा दावाही तिरोडकर यांनी केला. (प्रतिनिधी)
दोनेक आठवड्यांपासून तिरोडकर यांच्या नावाने पोलीस दलात ३१ डिसेंबरच्या आंदोलनाबाबतचा एसएमएस फिरत होता. पोलीस कर्मचारी संघटनेबाबतची माहिती जास्तीत जास्त पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा हेतू त्यामागे असावा. मात्र आता तो मेसेज तात्काळ डिलीट करून टाकावा, असा आदेश पोलिस शिपायांना देण्यात आल्याचे समजते.
३१ डिसेंबरला एक मिनिटासाठी वायरलेस सेटअप बंद पाडून आंदोलन करणार, याबाबतची आगाऊ माहिती राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ आणि मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना दिल्याचा दावा तिरोडकर यांनी केला आहे. याबाबत दयाळ यांना विचारले असता त्यांनी पोलीस कर्मचारी संघटन, त्यांच्याकडून होणारे संभाव्य आंदोलन याबाबत माहिती नाही, अशी प्रतिक्रिया लोकमतकडे व्यक्त केली.