कृत्रिम पावसासाठी चाचपणी
By Admin | Updated: May 24, 2016 03:38 IST2016-05-24T03:38:40+5:302016-05-24T03:38:40+5:30
मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची आॅक्टोबर २०१५ मध्ये सांगता झाल्यानंतर सी-बँड डॉप्लर रडार, विमान, फ्लेअर्स व इतर सामग्री हलविण्यात आली असली तरी पायाभूत यंत्रणेचा पूर्ण सांगाडा

कृत्रिम पावसासाठी चाचपणी
- विकास राऊत, औरंगाबाद
मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची आॅक्टोबर २०१५ मध्ये सांगता झाल्यानंतर सी-बँड डॉप्लर रडार, विमान, फ्लेअर्स व इतर सामग्री हलविण्यात आली असली तरी पायाभूत यंत्रणेचा पूर्ण सांगाडा अद्याप विभागीय आयुक्तालयातच आहे. गेल्या शुक्रवारी मुख्यमंत्र्यांकडे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. यंदा चांगल्या पावसाचा अंदाज आहे. जूनमध्ये अंदाज घेतल्यावर कृत्रीम पाऊस पाडण्याबाबत निर्णय होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.
१०० तासांवर १०० तास मोफत, असा कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी ‘ख्याती वेदर मॉडिफिकेशन’ या कंपनीसोबत करार करण्यात आला होता. २७ कोटींमध्ये ९० दिवस क्लाऊड सीडिंगचा प्रयोग करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. विमान पार्किंग, शास्त्रज्ञ, पायलटस्, तंत्रज्ञांचा आवास, निवास खर्चासह ते कंत्राट होते. ४ आॅगस्ट २०१५ रोजी प्रयोगाला सुरुवात झाली होती. आॅगस्टमध्ये १९ दिवस तर सप्टेंबरमध्ये ११ दिवस क्लाऊड सीडिंग करण्यात आले. आॅक्टोबरमध्ये ५ दिवस विमानाने उड्डाण घेतले.
यातून आॅगस्टमध्ये २५४ मि. मी., सप्टेंबरमध्ये २५२ मि. मी. पाऊस कृत्रिम प्रयोगातून झाल्याचा दावा करण्यात आला होता. कराराच्या ५० टक्केच विमानाने उड्डाण केले. १३ कोटी ५० लाख रुपयांचा जास्तीचा खर्च कंपनीला द्यावा लागला.