शहरवासीयांची भाज्यांसाठी वणवण

By Admin | Updated: July 20, 2016 01:40 IST2016-07-20T01:40:16+5:302016-07-20T01:40:16+5:30

सुरुवातीला आडत्यांनी बंद पुकारला. नंतर व्यापाऱ्यांनी त्यात मंडई बंद ठेवण्याचा सोमवारी तिसरा दिवस उजाडला.

Descriptive for the residents of the city | शहरवासीयांची भाज्यांसाठी वणवण

शहरवासीयांची भाज्यांसाठी वणवण


पिंपरी : सुरुवातीला आडत्यांनी बंद पुकारला. नंतर व्यापाऱ्यांनी त्यात मंडई बंद ठेवण्याचा सोमवारी तिसरा दिवस उजाडला. भाजी, तरकारी ही प्रत्येक कुटुंबाची रोजची गरज आहे. पालेभाज्या मिळाल्या नाहीत, तरी कोथिंबीर, आले आणि मिरची या रोजच्या स्वयंपाकासाठी अत्यावश्यक बाबी मिळत नसल्याने गृहिणींची तारांबळ होत आहे. घराजवळ हातगाडीवर भाजी विक्रीस येणाऱ्याकडे कांदे मिळाले, तर मिरची मिळत नाही. मिरची मिळाली, तर कोथिंबिरीचा शोध घेण्यासाठी दुसऱ्या परिसरात जाऊन हातगाडीवर भाजी विक्री करणाऱ्याचा शोध घ्यावा लागतो. ही परिस्थिती शहरात सध्या विविध भागात दिसून येत आहे.
राज्य शासनाने शेतमाल नियमनमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या निषेधार्थ शहर व मावळ तालुक्यातील विविध व्यापारी संघटनांनी १७ जुलैपासून बेमुदत बंदचा निर्णय घेतला आहे. शेतमालावरील ६ ते १० टक्के दलाली शेतकऱ्यांकडून न घेण्याचा आणि शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे पुण्यानंतर पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, कृष्णानगर, तळेगाव, लोणावळा व कामशेत मंडईतील विविध संघटनांनी शासनाचा निषेध नोंदवला. मंडई बेमुदत बंद ठेवून अांदोलन सुरू केले. सलग तीन दिवस मंडई बंद असल्याने ग्राहकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. रविवारी बहुतेकांना सुटी असते. त्या दिवशी आठवडाभर पुरेल इतकी भाजी खरेदी केली जाते. परंतु रविवारीच मंडई बंद होती. आंदोलनाचा पहिला दिवस सर्वच मंडईमध्ये शुकशुकाट होता. नेहमीप्रमाणे भाजी खरेदी करणे शक्य झाले नाही. घराजवळ परिसरात भाजीवाल्याचा आवाज कानी पडताच त्याचा शोध घेऊन त्याच्याकडे उपलब्ध असेल ते खरेदी करणे अनेकांनी पसंत केले.
मुलांना शाळेचा डबा देताना, भाजी काय द्यायची इथपासून ते दुपारी, सायंकाळी भाजी काय करायची हा प्रश्न एरवीसुद्धा गृहिणींना भेडसावत असतो. आता मंडई बंद असल्याने पालेभाज्या मिळेना झाल्यात. त्यामुळे भाजी काय करायची हा प्रश्न त्यांच्यासाठी आणखी गंभीर बनला आहे. हॉटेल, खाणावळवाल्यांचीही मोठी गैरसोय झाली आहे. (प्रतिनिधी)
सोसायट्या फेरीवाल्यांच्या शोधात
फेरीवाल्यांना प्रवेश नाही, असा मोठा फलक लावणाऱ्या सोसायट्यांमधील रहिवासीसुद्धा घराबाहेर पडून फेरीवाल्यांचा शोध घेताना दिसून येत आहेत. कोणाचाही ओरडण्याचा आवाज आल्यास भाजीविक्रेता आहे, असे समजून तीन मजले खाली उतरून येण्यापर्यंत रहिवाशांची मानसिकता बदलली आहे. एरवी फेरीवाल्यांना मज्जाव करणारे फेरीवाल्याचा शोध घेत असल्याचे उलट परिस्थितीचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.

Web Title: Descriptive for the residents of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.