‘एसआरए’च्या उपजिल्हाधिकारींवर वकिलाला मारहाण केल्याचा आरोप
By Admin | Updated: March 2, 2017 02:19 IST2017-03-02T02:19:52+5:302017-03-02T02:19:52+5:30
उपजिल्हाधिकारी स्वाती कारलेंनी मारहाण केल्याचा आरोप अॅड. आनंद सांगवीकर यांनी केला आहे.
_ns.jpg)
‘एसआरए’च्या उपजिल्हाधिकारींवर वकिलाला मारहाण केल्याचा आरोप
मुंबई : वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए)कार्यालयात सुनावणीवेळी उपजिल्हाधिकारी स्वाती कारलेंनी मारहाण केल्याचा आरोप अॅड. आनंद सांगवीकर यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी निर्मलनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याने वकिलांनी पोलीस उपायुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता.
निर्मल नगर येथील शांतीनगर येथे सुरू असलेल्या एसआरए प्रोजेक्टमध्ये अॅन्जेलिना जॉर्ज रॉड्रीक्स यांना अपात्र घोषित करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी एसआरए विभागाकडे तक्रार केली. त्यात त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्यावर उपजिल्हाधिकारी यांच्याकडे अंतिम सुनावणी होणार होती. जानेवारीमध्ये हे प्रकरण उपजिल्हाधिकारी कारले यांच्याकडे आले. अशात पाठपुराव्याअंती त्यांना २७ तारखेला सकाळी साडे दहा वाजता कारले यांच्यापुढे सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितले.
अखेर न्याय मिळेल म्हणून रॉड्रिक्स कुटुंबीय त्यांचे वकील आनंद सांगवीकर यांच्यासह तेथे हजर झाले. मात्र कारले या बाहेर असल्याने त्यांना तेथेच ताटकळत थांबावे लागले. अखेर दुपारी साडे तीनच्या सुमारास त्या तेथे आल्या. त्यांनी रॉड्रिक्स यांना बोलावून घेतले. त्यात काही कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. त्याचदरम्यान एका कागदावर त्यांनी सांगवीकर यांना सही करण्यास सांगितले. मात्र त्यात किमान आपल्या नावाचा उल्लेख करण्याची मागणी त्यांनी केली. याच रागात कारले यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत कानशिलात लगावल्याचा आरोप सांगवीकर यांनी केला आहे.
या घटनेनंतर सांगवीकर यांनी निर्मलनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. मात्र अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलीस गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे सांगवीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या मारहाणीचा निषेध करत वकिलांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याने वकिलांनी पोलीस उपायुक्त कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला होता. त्यानंतर तपास अधिकारी बदलून त्यांचा नव्याने जबाब नोंदविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)