ठाणे - राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने खळबळ माजली. ठाण्यातील २४ वर्षीय तरुणाने इन्स्टाग्रामला रिल करून शिंदेंच्या घरावर गोळीबार करणार अशी धमकी दिली. त्यानंतर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली असून तरुणाला अटक करावी अशी मागणी केली. पोलिसांनी या तरुणावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
याबाबत शिवसेनेचे पदाधिकारी म्हणाले की, श्रीनगर परिसरातील एक इसम आहे त्याचे नाव हितेश धेंडे असं आहे. त्याने ६.३० वाजताच्या सुमारास इन्स्टाग्रामवर लाईव्ह व्हिडिओ केला. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ करणे आणि त्यांच्या घरावर गोळीबार करणार अशी धमकी दिली आहे. आमच्याकडे ही पोस्ट आल्यानंतर आम्ही तातडीने पोलीस ठाणे गाठले आणि संबंधित तरूणाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. पोलिसांनी हा गुन्हा नोंद करून घेतला आहे.
नेमकं काय घडलं?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. ठाण्यातील श्रीनगर येथील वारली पाडा येथे राहणारा तरूण ज्याचं नाव हितेश धेंडे आहे त्याने शिंदेंना धमकी देणारा व्हिडिओ पोस्ट केला. हितेशचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी श्रीनगर पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. संबंधित तरुणाविरोधात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे केली.
दरम्यान, हा तरूण विकृत प्रवृत्तीचा असून त्याने ही पोस्ट का केली, एकनाथ शिंदे यांना धमकी का दिली याचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतरही शिवसैनिकाने या तरुणाचा शोध सुरू केल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.