Ajit Pawar on Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या पदाधिकारी मेळाव्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावार भाष्य केलं होतं. विधानसभा निवडणूक निकाल लागल्यावर महाराष्ट्रभर सन्नाटा पसरला. लोकांनाच हा निर्णय पचला नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. या मतदानावर जाऊ नका लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे, पण ते मतदान कुठेतरी गायब झालं, असेही राज ठाकरे म्हणाले. यावेळी राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करत त्यांना मिळालेल्या जागांवर प्रश्न उपस्थित केला होता. आता अजित पवार यांनी राज ठाकरे यांनी जोरदार टोला लगावत प्रत्युत्तर दिलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. लोकांनी आपल्याला मतदान केले फक्त ते आपल्यापर्यंत आले नाही. अशा प्रकारे निवडणुका होत असतील तर त्या न लढविलेल्या बऱ्या, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच अजित पवार यांना ४२ जागा आणि शरद पवार यांना इतक्या कमी जागा कशा मिळाल्या असा सवालही राज ठाकरेंनी केला होता. यावर बोलताना अजित पवार यांनी राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या पराभवाचा उल्लेख केला आहे.
भूमिका मांडल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "राज ठाकरेंनी निवडणूक निकालावर केलेल्या वक्तव्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही. आम्हाला जनतेने निवडून दिलं आहे. आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत ज्यावेळेस १७ जागाच मिळाल्या, त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाहीत की, आमची एक जागा आली आम्ही काय करायचं?" असा टोला अजित पवार यांनी लगावला.
"अरे तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आमच्यावर गप्पा मारता. या वेळेस आम्ही कष्ट घेतले होते, मेहनत घेतली होती. तुम्ही सगळे बघत होता. मलाही एका लोकसभेच्या निवडणुकीत मुलाला निवडून आणता आलं नाही . माझ्या पत्नीलाही या लोकसभा निवडणुकीत निवडून आणता आलं नाही. पण लोकांनी कौल दिला. त्यात ईव्हीएममध्ये गडबड झाली नाही. जनतेने मतदान केलं ते आम्ही लोकशाहीत मान्य केलं पाहिजे", असं अजित पवार यांनी म्हटलं.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
"विधानसभा निकालानंतर पहिल्यांदाच इतका सन्नाटा पसरला होता. भाजपला १३२ जागा मिळाल्या हे समजू शकतो. पण, अजित पवार यांना ४२ जागा ? ज्यांच्या जिवावर यांनी राजकारण केले त्या शरद पवार यांना इतक्या कमी जागा कशा ? लोकसभेला काँग्रेसचे १३ खासदार जिंकले, त्यांचे १५ आमदार आले ? चार महिन्यांत लोकांच्या मनात इतका फरक पडला ? काय झाले, कसे झाले हा संशोधनाचा विषय आहे," असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं.